आव्हानांना तोंड देण्यासाठी क्षमता विकसित करण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार

- नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

नवी दिल्ली – भारताचे लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी पदभार स्वीकारला आहे. 30 एप्रिल रोजी जनरल मनोज मुकूंद नरवणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यानंतर जनरल मनोज पांडे देशाचे 29वे लष्करप्रमुख बनले आहेत. रविवारी माध्यमांना संबोधित करताना नव्या लष्करप्रमुखांनी आपण कुठलीही मोहीम फत्ते करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वच पातळीवरील क्षमता वाढविण्यावर सर्वाधिक भर देणार असल्याची घोषणा केली. त्याचवेळी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील यथास्थिती कुणालाही बदलू दिली जाणार नाही, असे नव्या लष्करप्रमुखांनी बजावले आहे.

क्षमतासध्याच्या काळातील तसेच भविष्यातील सर्वच सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली अत्युच्च दर्जाची क्षमता विकसित करण्याला आपण सर्वाधिक प्राधान्य देणार आहोत, असे जनरल पांडे यांनी ठासून सांगितले. तसेच जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडी व आव्हानांचे स्वरुप लक्षात घेता, देशाच्या लष्कराचा वायुसेना व नौदलाबरोबरील समन्वय अतिशय महत्त्वाचा ठरेल, याची जाणीव नव्या लष्करप्रमुखांनी करून दिली आहे. याबरोबरच लष्करामध्ये सुरू असलेल्या सुधारणांची प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचे संकेत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिले.

क्षमता विकसित करून नव्या तंत्रज्ञानाचा लष्करात समावेश करण्याला आपण प्राधान्य देऊ. तसेच संरक्षणदलांमधील समन्वय व सहकार्य अधिकाधिक व्यापक करणे हे आपल्यासमोरील ध्येय असेल, असा दावा लष्करप्रमुखांनी केला आहे. यासाठी वायुसेना व नौदलाबरोबरील संवादाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाईल, असे जनरल पांडे पुढे म्हणाले. आधीच्या लष्करप्रमुखांनी सुरू केलेले उपक्रम अधिक जोमाने पुढे नेले जातील, अशी ग्वाही देऊन लष्करप्रमुखांनी दिली. जवानांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांना महत्त्व दिले जाईल, असे लष्करप्रमुखांनी म्हटले आहे.

ही मोठी जबाबदारी पार पाडण्याची क्षमता आपल्याला परमेश्वराकडून मिळो, अशी प्रार्थना यावेळी लष्करप्रमुखांनी केली. दरम्यान, लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेण्याच्या आधी, जनरल असलेल्या मनोज पांडे यांची नियुक्ती चीनबरोबरच्या एलएसीवर झाली होती. सिक्कीम आणि अरूणचल प्रदेशताली एलएसीची सुरक्षा त्यांनी उत्तमरित्या हाताळली होती. लडाखच्या एलएसीवर तणाव निर्माण झालेला असताना, चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशमधील एलएसीवर घुसखोरीचे प्रयत्न केले होते. पण भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे चीनचे हे सारे प्रयत्न अपयशी ठरले होते.

पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती कुणालाही बदलू दिली जाणार नाही, असा संदेश लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी शेजारी देशांना दिला. त्याऐवजी एलएसीवरील तणाव कमी करून इथे आधीच्या काळात होती, तशी परिस्थिती निर्माण करणे हे भारतीय लष्कराचे ध्येय असल्याचे जनरल पांडे यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानबरोबरील एलओसीवरील परिस्थितीबाबत बोलताना, इथला तणाव कमी झाल्याचे सांगून त्यावर लष्करप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. मात्र पाकिस्तानने उभे केलेले दहशतवाद्यांचे नेटवर्क आणि त्यांची प्रशिक्षण केंद्र अजूनही बंद पडलेली नाहीत, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. उलट सध्याच्या काळात एलओसीवरील दहशतवाद्यांच्या हालचालींमध्ये वाढ झालेली आहे, अशी नोंद लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी केली.

याद्वारे नव्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावल्याचे दिसत आहे. आधीच्या काळातही जवळपास याच शब्दात त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. तसेच पाकिस्तानातून दहशतवादी संघटनांनी घुसखोरी तसेच घातपाती कारवायांचे प्रयत्न केले, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून कारवाई करताना कचरणार नाही, असेही जनरल नरवणे यांनी बजावले होते. नव्या लष्करप्रमुखांनीही पाकिस्तानच्या हालचालींवर लष्कराची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव पाकिस्तानी लष्कर तसेच दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना करून दिली आहे.

leave a reply