अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया न्यूलँड यांची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा

व्हिक्टोरिया न्यूलँडनवी दिल्ली – अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री व्हिक्टोरिया न्यूलँड भारताच्या भेटीवर आल्या आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांची भेट घेऊन चर्चा केली. न्यूलँड यांच्याशी भारतीय उपखंड, इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि दोन्ही देशांच्या सामायिक हितसंबंधांवर चर्चा पार पडल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. तर रशियन शस्त्रास्त्रांवरील भारताचे अवलंबित्त्व कमी करून यासाठी भारताला पर्याय देण्याची जबाबदारी अमेरिकने स्वीकारायला हवी, असे सांगणाऱ्या व्हिक्टोरिया न्यूलँड यांच्या या दौऱ्याकडे विश्लेषक बारकाईने पाहत आहेत.

नेपाळला भेट दिल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपमंत्री न्यूलँड भारताच्या भेटीवर आल्या आहेत. भारतानंतर त्या श्रीलंका व कतार या देशांचा दौरा करतील. आपला हा दौरा सुरू करण्यापूर्वी, अमेरिकी संसदेच्या समितीसमोरील सुनावणीत व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी लक्ष वेधून घेणारी विधाने केली होती. युक्रेनच्या युद्धात रशियन शस्त्रास्त्रांची व संरक्षणसाहित्याची सुमार कामगिरी लक्षात घेता, भारताचे यामधील स्वारस्य नक्कीच कमी झाले असेल, असा शेरा अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी मारला होता. त्यावर बोलताना व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी रशियन शस्त्रास्त्रांवरील भारताचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी अमेरिकेने पर्याय द्यायला हवा, असे आपल्याला वाटत असल्याचे म्हटले होते. आपल्या आगामी भारत दौऱ्यात हा मुद्दा आपण उचलून धरणार असल्याचे न्यूलँड यांनी म्हटले होते.

मंगळवारी भारतात दाखल झालेल्या न्यूलँड यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचे सारे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पुरविण्यासाठी अमेरिका उत्सुक असल्याचे याआधीही वेळोवेळी स्पष्ट झाले होते. पण अमेरिकेकडून यासंदर्भात मिळत असलेल्या सर्वच प्रस्तावांना भारताकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अमेरिकेकडून लढाऊ व लष्करी वाहतूक करणारी हेलिकॉप्टर्स तसेच टेहळणी विमाने आणि रिपर ड्रोन्स भारताने खरेदी केले आहेत. पण अमेरिकेला भारताकडून याहूनही फार मोठ्या अपेक्षा आहेत.

भारताने अमेरिकेकडून लढाऊ विमाने, पाणबुड्या व युद्धनौका खरेदी कराव्या आणि हवाई सुरक्षा यंत्रणेसाठीही भारताने अमेरिकन कंपन्यांचा विचार करावा, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. मात्र भारताने आपल्या वायुसेनेसाठी फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी केली असून विमानवाहू युद्धनौकेसाठी देखील रफायलची नौदल आवृत्ती खरेदी करण्यासाठी भारताने पावले उचलल्याचे दावे केले जातात. तसेच पुढच्या काळात भारताला संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांचा खरेदीदार बनण्यात स्वारस्य नसून त्याच्या देशांतर्गत निर्मितीसाठी भारताने तयारी सुरू केली आहे.

भारताच्या या आकांक्षेची जाणीव झालेल्या रशिया व फ्रान्स या देशांनी भारताला संरक्षणसाहित्याशी निगडीत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याचा सूज्ञ निर्णय घेतलेला आहे. पण अमेरिका यासाठी तयार नसल्याचे याआधी उघड झाले होते. अशा परिस्थितीत भारताने रशियन शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या ऐवजी अमेरिकेचा पर्याय निवडावा यासाठी व्हिक्टोरिया न्यूलँड करीत असलेल्या प्रयत्नांना भारताकडून दिल्या जात असलेल्या प्रतिसादाकडे जगभरातील सामरिक विश्लेषकांची नजर लागलेली आहे.

हिंदी

leave a reply