कोरोनाच्या साथीत अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

• मोफत शिक्षण, विमा व 10 लाखांची आर्थिक मदत
• घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना पेंशन मिळणार
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या साथीमध्ये आपले पालक गमावल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. तसेच 18 वर्षांनंतर स्टायपेंड मिळणार असून विमा, उच्चशिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाबरोबर 10 लाखांचे आर्थिक सहाय्यही देण्यात येणार आहे. याशिवाय या साथीत कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांनाही पेंशन देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. सरकार अशा कुटुंबांबरोबर उभी असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

कोरोनाच्या साथीत अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणाकोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कित्येक मुलांनी आपले दोन्ही पालक किंवा घरचे सर्व सदस्य गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाप्रकारे अनाथ मुलांसाठी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने एका नोटीस जारी करीत अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया आखून दिली होती. यानुसार अशा मुलांना जिल्हा बालकल्याण समितीपुढे सादर करून त्यांच्या आवश्यकता जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच त्यानंतर त्यांच्या पूनर्वसनासदर्भात योग्य आदेश देण्यात येत आहे.

याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीनंतर शनिवारी अशा अनाथ मुलांसाठी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोरोनाच्या साथीत पालक गमावल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी व तसेच कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरीता ही बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अनाथ झालेल्या मुलांसाठी ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन’ ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेअंतर्गत अशा सर्व अनाथ मुलांचे शिक्षण व त्यांच्या भरणपोषणासाठी आर्थिक सहाय्याचा खर्च उचलला जाणार आहे.

‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन’अंतर्गत सरकार या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च करेल. या मुलांना 18 वर्ष पुर्ण झाल्यावर स्टायपेंड काही रक्कम दर महिन्याला दिली जाणार असून 23 व्या वर्षी 10 लाखांची एकरकमी मदत करण्यात येणार आहे. हे आर्थिक सहाय्य त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल. याशिवाय या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्जाची सुविधाही सरकार उपलब्ध करून देणार असून हे कर्ज बिनव्याजी असणार आहे. शिक्षणांसाठी ही मुले जे कर्ज घेतील, त्याचे व्याज सरकार पीएम केअर फंडातून भरणार आहे. याशिवाय अशा मुलांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत विमाही काढण्यात येणार आहे. या विम्याचा प्रिमीयम देखील पीएम केअर्स फंडाद्वारे भरला जाणार आहे.

याखेरीच बर्‍याच कुटुंबांनी कोरोना साथीच्या आपत्तीत आपल्या घरच्या कर्त्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांनाही आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार या साथीत घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना दरमहिना पेंशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा मंडळ (ईएसआयसी) अंतर्गत हे फॅमिली पेंशन दिले जाणार आहे. याशिवाय एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शूरन्स (ईडीएलआय) योजनेतर्गत अशा कुटुंबांना
विम्याचा लाभही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

leave a reply