अमेरिकी जवानांनी युरोपमधील अण्वस्त्रांचे सिक्रेट्स ऑनलाईन केले – ब्रिटीश संकेतस्थळाची खळबळजनक माहिती

वॉशिंग्टन – युरोपमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर किती अण्वस्त्रे आहेत, ही अण्वस्त्रे कुठे ठेवली आहेत, या अण्वस्त्रांचे कोड्स काय आहेत आणि या अण्वस्त्रांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांचे वेळापत्रक काय आहे, अशी अतिशय स्फोटक माहिती ऑनलाईन झाली. अमेरिकी जवानांनीच लहान मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅपवर ही माहिती नोंदविल्याचे ‘बेलिंगकॅट’ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले. यावर अमेरिका आणि नाटोने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

अण्वस्त्रांचे सिक्रेट्सजगभरात अमेरिकेचे लष्करी व हवाई तळ आहेत. यातील काही तळांवर अण्वस्त्रे देखील तैनात करण्यात आलेली आहे. मात्र याबाबतचे तपशील व माहिती अमेरिकेकडून उघड केली जात नाही. ज्या देशात अमेरिकेचे असे तळ आहेत, त्या देशातील जनतेलाही याबाबतची माहिती नसते. पण जर्मनी, नेदरलँड, इटली, बेल्जिअम आणि तुर्की या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर किती व कोणती अण्वस्त्रे आहेत, याची सर्व माहिती सार्वजनिक झालेली आहे.

शोधपत्रकारिता करणार्‍या ‘बेलिंगकॅट’ या ब्रिटीश संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले. युरोपमधील लष्करी तळांवर तैनात असलेल्या अमेरिकी जवानांनी हा प्रकार केल्याचे बेलिंगकॅटने म्हटले आहे. लष्करी तळांवर ठेवण्यात आलेल्या अण्वस्त्रांचे कोड्स व त्यासंबंधीची सर्व माहिती सुरक्षेच्या कारणास्तव ठराविक महिन्यानंतर बदलली जाते. या अण्वस्त्रांचे सारे तपशील संबंधित अधिकारी व जवानांच्या लक्षात राहणे आवश्यक असते.

अण्वस्त्रांचे सिक्रेट्सपण अमेरिकी जवानांनी अण्वस्त्रांबाबतची ही माहिती लक्षात ठेवण्याऐवजी मुलांसाठी वापरण्यात येणार्‍या स्टडी अ‍ॅप्लिकेशनमध्ये साठविल्याचा दावा ब्रिटीश संकेतस्थळाने केला. यासाठी अमेरिकी जवानांनी चेग प्रेप, क्विझलेट आणि क्रॅम यासारख्या स्टडी अ‍ॅपमधील फ्लॅशकार्ड्सचा वापर केला. यापैकी चेग अ‍ॅपमधील 70 फ्लॅशकार्ड्समध्ये नेदरलँडमधील हवाईतळावर साठविलेल्या अण्वस्त्रांची गोपनीय माहिती होती. तर इटलीच्या एवियानो हवाईतळावरील अण्वस्त्रांचे तपशील क्रॅम अ‍ॅपच्या 80 फ्लॅशकार्ड्समध्ये साठविले होते.

याप्रमाणे जर्मनी, बेल्जिअम आणि तुर्कीतील लष्करी तळांवरील अण्वस्त्रांची माहितीही या स्टडी अ‍ॅपच्या फ्लॅशकार्ड्समध्ये साठविलेली होती. याशिवाय सदर तळावरील सिक्युरिटी कॅमेरा, तसेच शत्रूच्या हल्ल्यावेळी वापरले जाणारे कोड्स यांचाही उल्लेख यामध्ये होता. 2013 सालापासून ते एप्रिल 2021 पर्यंतचे तपशील काही ठिकाणी आढळले आहेत.

बेलिंगकॅटने यासंबंधीची बातमी प्रसिद्ध करण्याआधी अमेरिकी लष्कर आणि नाटोला याची माहिती कळविली होती. त्यानंतर सदर माहिती या स्टडी अ‍ॅपवरुन गायब केल्याचे बेलिंगकॅटने म्हटले आहे.

leave a reply