कोरोनाव्हायरस फैलावत असलेल्या जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येने १७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. चोवीस तासात या साथीच्या रुग्णांची संख्या १,५४० ने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने  राज्यांना लॉकडाऊनच्या नियमांचे आणि केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, मध्यप्रदेशात इंदौर, राजस्थानात जयपूर आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, पूर्व २४ परगणासह काही भागात  स्थिती चिंताजनक बनली  आहे. येथे लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे झाले नाही, तर संक्रमण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय  पथक पाठविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने  दिली.

देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या वाढून ५५६ वर पोहोचली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या १७,६५६ झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात नऊ  जण दगावले, तर ४६६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४,६६६ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत चोवीस तासात सात  जण दगावले, तर १५५ नव्या रुग्णांची नोंद झाली. 

देशाच्या  काही  भागात  लॉकडाऊन काळात स्थिती सुधारल्याचे, तर काही भागात स्थिती बिघडत चालल्याचे केंद्रीय गृह व आरोग्य मंत्रालयाचे म्हटले आहे. या साथीच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला  असून तो ३.४ दिवसांवरून ७.५ दिवस इतका कमी  झाला आहे. देशातील १८ राज्ये व केंद्रशासित  प्रदेशात या राष्ट्रीय सरासरीपेक्षाही रुग्ण दुप्पट होण्याचा काळ वाढल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव यांनी दिली. या पूर्वी घोषित केल्याप्रमाणे रुग्ण आढळत नसलेल्या काही भागांमध्ये अंशतः लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र येथे मास्क घालणे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे  आवश्यक आहे. लॉकडाऊन हीच सध्या या साथीवर  उपलब्ध लस आहे, असे सांगून मुंबईत काही पत्रकारांना या साथीची लागण झाल्याबद्दल अग्रवाल यांनी  चिंता व्यक्त केली. 

”ज्या शहरांमधून  लॉकडाऊनच्या   उल्लंघनाच्या घटना समोर येत आहेत, तेथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अंतर मंत्रालयीन पथक  स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाव्हायरसचा  संसर्ग कमी न झालेल्या भागात, तसेच लॉकडाऊनचे पालन न होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हे पथक पाठविण्यात येत  आहेत . मुंबई, पुणे, इंदौर, जयपूर, कोलकाता, दार्जिलींग, २४ परगणा, जलपायगुडी,  मेदिनीपूरमध्ये ही पथक पाठविण्यात आली आहेत”, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या सलीला श्रीवास्तव यांनी दिली. ”राज्यांच्या सहकार्यासाठी ही पथके  पाठविण्यात आली आहेत. ही पथके परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांना उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करतील”, असेही श्रीवास्तव म्हणाल्या. 

दरम्यान महाराष्ट्रात हे पथक दाखल झाल्याची बातमी आहे. राज्यात ७५ हजार रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहेत. या रॅपिड टेस्टला केंद्राने मंजुरी दिली आहे.  मुंबई, पुण्यात हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये या रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तसेच मुंबईत काही भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

leave a reply