जगभरात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे पाच हजाराहून अधिक बळी

जगभरात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे पाच हजाराहून अधिक बळी

वॉशिंग्टन/रोम – जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाव्हायरसमुळे सोमवारी ५,४०० हून अधिक जणांचा बळी गेला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जगभरात कोरोनाच्या बळींच्या तसेच या साथीच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची नोंद झाली. पण अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमध्ये या साथीने महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला असून, येत्या दिवसात या साथीबाबत अधिक जागरुक राहणे गरजेचे असल्याचे आवाहन जागतिक नेते व वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.

 सोमवारी अमेरिकेत या साथीने १,४३३ जण दगावले असून या देशात कोरोनाव्हायरसमुळे एकूण ४२,१३८ जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेच्या काही भागात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली असून व्हाईट हाऊसने यावर चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेपाठोपाठ फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासात ५४७ जणांचा बळी गेला असून या देशातील एकूण बळींची संख्या २०,२६५ वर पोहोचली आहे. या साथीमध्ये वीस हजाराहून अधिक जणांचे प्राण गमाविणारा फ्रन्स हा चौथा देश ठरला आहे. आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राच्या इतिहासासाठी ही एक दुख:द घटना असल्याचे वैद्यकीय अधिकारी सॉलोमन यांनी सांगितले.

सोमवारी या साथीने इटलीमध्ये ४५४ जणांचा बळी गेला. इटलीत या साथीने सर्वाधिक २४,११४ जणांचा बळी गेला आहे. तर गेल्या चोवीस तासात या देशात कोरोनाव्हायरसचे २२५६ नवे रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये एका दिवसात ४४९ जणांचा बळी गेला असून येथील एकूण बळींची संख्या १६,५०९ वर पोहोचली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटन तसेच इतर युरोपिय देशांनी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे म्हटले आहे. पण येत्या काळात कोरोनाव्हायरस बाबत आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ही साथ मंदावली असली तरी या साथीचे उच्चाटन झालेले नाही, याकडे जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी लक्ष वेधले.

leave a reply