भारताबरोबर छाबहार रेल्वे प्रकल्प करार झालाच नाही

- इराणचा खुलासा

तेहरान – चीनने इराणमध्ये चारशे अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. चीनबरोबरच्या या सहकार्याचा परिणाम म्हणून इराणने भारताला छाबहार रेल्वे प्रकल्पातून हद्दपार केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणचा हा निर्णय भारताबरोबरच्या संबंधाना हादरा देणारा असल्याचे दावे सुरू झाले होते. मात्र, छाबहार रेल्वेप्रकल्पाबाबत भारत आणि इराणमध्ये कुठल्याही प्रकारचा करार झाला नसल्याचे सांगून इराणने सदर वृत्त फेटाळले आहे.

Chabhar-Rail-Projectइराणच्या ‘पोर्ट अँड मेरिटाईम ऑर्गनायझेशन’चे उपप्रमुख फरहाद मोंतासेर यांनी ‘अल जझिरा’ या आखातातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत छाबहार-झाहेदन रेल्वेप्रकल्पाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त फेटाळले. इराणने छाबहारमधील गुंतवणुकीबाबत भारताशी फक्त दोन करार केले असून यामध्ये रेल्वेप्रकल्पाच्या विकासाचा करार नसल्याचे मोंतासेर म्हणाले. छाबहार रेल्वेप्रकल्पातील पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली होती. मात्र, यापलिकडे कुठल्याही प्रकारचा करार झाला नसल्याची माहिती मोंतासेर यांनी दिली. त्याचबरोबर अमेरिकेच्या निर्बंधांचे भारत-इराण सहकार्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे मोंतासेर यांनी स्पष्ट केले.

इराणकडून आलेल्या या स्पष्टीकरणामूळे भारताचे इराणबरोबरील मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका विरोधाच्या मुद्यावर इराण आणि चीनला एकत्र आणले आहे. इराणला चीनच्या गुंतवणुकीची गरज आहे तर, चीनला इराणचे इंधन हवे आहे. यामुळे चीनने इराणमध्ये सुमारे ४०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. पण याचा अर्थ इराण भारताबरोबरील आपले संबंध गुंडाळून ठेवण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारत इराणबरोबर अपेक्षित सहकार्य करू शकत नाही, याची इराणलाही जाणीव आहे, याकडे भारतीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

Chabhar-Rail-Projectइराणबरोबरील सहकार्य प्रस्थापित करीत असताना सर्वातआधी चीन भारताचा इराणवरील प्रभाव संपविण्याचा प्रयत्न करील व कदाचित छाबहार बंदर भारताच्या हातून निसटूही शकेल. पण छाबहार बंदराचा विकास चीनकडून केला जाणे, याचा अर्थ चीनचे पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील स्वारस्य संपले, असा होता. ही भारतासाठी मोठ्या समाधानाची बाब ठरते, असे भारताच्या सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनने इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानात व्यक्त केली जाणारी नाराजी या दाव्याला दुजोरा देत आहे.

चीन पाकिस्तानचा निकटम मित्रदेश असूनही पाकिस्तानात चीनने अवघे ६५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. पण चारशे अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी चीनने इराणला निवडले. हा विश्वासघात ठरतो, असे दावे पाकिस्तानचे काही पत्रकार करीत आहेत. त्याचवेळी जगभरातील पाकिस्तानच्या दुतावासाचे राजनैतिक अधिकारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला चीनबरोबरील सहकार्याचे गंभीर परिणाम समोर येत असल्याचा इशारा देऊ लागले आहेत. कोरोनाव्हायरसची साथ, हॉंगकॉंग, तैवान आणि साऊथ चायना सी वरुन स्वीकारलेल्या आक्रमक धोरणामूळे चीन जगभरात बदनाम झाला आहे. कुठलाही जबाबदार देश यावेळी चीनच्या बाजूला उभा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत चीनचा सहकारी देश म्हणून पाकिस्तानलाही प्रमुख देशांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, असे राजनैतिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला बजावले आहे.

leave a reply