देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांजवळ 

नवी दिल्ली/मुंबई – देशात चोवीस तासात ३२ हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या गुरुवारी सकाळपर्यँत ९,६८,८७६ वर पोहोचली होती. तर गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात २६६ रूग्ण दगावले, तर ८,६४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुबंईत ५६ जण दगावले असून १४९८ नवे रुग्ण आढळले.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या

देशात कोरोनाच्या दरदिवशी सव्वा तीन लाखांहून अधिक चाचण्या होत आहेत. बुधवारी देशभरात ३,२६,८२७ चाचण्या घेण्यात आल्या. मार्चपासून देशात एक कोटी २७ लाख चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढत असताना नव्या रुग्णांची नोंदही वाढली आहे. बुधवारपासून गुरुवारी सकाळपर्यंत ३२,६९६ नव्या रूग्णांची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच एका दिवसात ३० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. गुरुवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात सुमारे ३० हजार नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातच साडे आठ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

तमिळनाडूत ४५४९ नवे रूग्ण आढळले असून ६९ जणांचा मृत्यू या साथीमुळे झाला आहे. महाराष्ट्र आणि तामिळ्नाडूनंतर कर्नाटक राज्यात कोरोनाच्या साथीच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले आहे. या राज्यात गुरुवारी प्रथमच ४ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात चोवीस तासात १०४ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला असून ४,१६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत १६५२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ५८ जण दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यातच एका दिवसात १७ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात आणखी काही शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन २६ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर, जिल्ह्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला होता. ठाण्यातही दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत.

leave a reply