‘एलएसी’वरील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षणदलप्रमुख जनरल रावत लडाख दौर्‍यावर

- चीनने १० हजार सैनिक मागे घेतल्याचे दावे

नवी दिल्ली – चीनने गेल्या वर्षी गलवान व्हॅलीत केलेल्या आगळिकीनंतर भारताने चीन सीमेवरील आपली संरक्षणसिद्धता मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. या क्षेत्रात तैनात असलेल्या सैन्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांसह सर्वोच्च लष्करी अधिकारी वारंवार भेट देत आहेत. सोमवारी देशाचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत लडाखच्या दौर्‍यावर दाखल झाले आहेत. जनरल रावत दाखल होत असतानाच चीनने लडाखच्या आघाडीवरील १० हजार सैनिक मागे घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

लष्करी सज्जतेचा आढावा

शुक्रवारी लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करणार्‍या चीनच्या जवानाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले होते. चिनी जवानाच्या या घुसखोरीने एलएसीवरील तणाव वाढण्याचे संकेत मिळाले होते. मात्र सोमवारी सकाळी भारतीय लष्कराने या जवानाची सुटका करून त्याला चिनी लष्कराच्या ताब्यात सोपविले आहे. सोमवारी सकाळी १०च्या सुमारास ‘चुशुल-मोल्दो बॉर्डर पॉईंट’वर चिनी लष्कराच्या ताब्यात सोपविण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. आपल्या जवानाची भारताने त्वरित सुटका करावी, यासाठी चीनच्या लष्कराने आवाहन केले होते. मात्र यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज चीनच्या जवानाला सोडता येणार नाही, असे भारतीय लष्कराने बजावले होते.

गेल्या वर्षी चीनने लडाख ‘एलएसी’वर मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती करून भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले होते. जून महिन्यात गलवान व्हॅलीत चीनने भारतीय लष्कराची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या कारवाईविरोधात भारताने आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यानंतरही चीनने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवत भारतावर माघारीसाठी दबाव टाकण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. मात्र चीनच्या तोडीस तोड तैनाती करून भारताने चीनची कारस्थाने उधळून लावली.

लडाख एलएसीवर चीनने ५० हजार सैनिक आघाडीवर तैनात केल्याचे सांगण्यात येते. भारतानेही तितकीच तैनाती करून चीनला इशारा दिला. भारत केवळ लष्करी तैनाती करून थांबला नसून भारताचे संरक्षणमंत्री तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी सातत्याने या भागांना भेट देत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखच्या एलएसीला भेट दिली होती. सोमवारी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी लडाखच्या एलएसीचा दौरा सुरू केला आहे. या दौर्‍यात ते इथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. गेल्याच आठवड्यात जनरल रावत अरुणाचल प्रदेशमधील एलएसीला भेट दिली होती. लडाखच्या एलएसीनंतर संरक्षणदलप्रमुख जम्मू काश्मीरच्या सीमेला भेट देणार असल्याचे वृत्त आहे.

leave a reply