चीनची आपल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळण्याची सूचना   

बीजिंग – ऑस्ट्रेलियात वांशिक भेदभाव व  वंशद्वेषातून होणारी हिंसा वाढल्याचा दावा करून  चीनने आपल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळण्याची सूचना केली आहे.  कोरोनाव्हायरसची साथ वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियात ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून चीनच्या पर्यटन मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया चीनी नागरिकांसाठी सुरक्षित नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. यावर ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया आली आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री    सिमन बर्मिंगहॅम यांनी चीनने केलेले हे आरोप धुडकावले आहेत.

कोरोनाव्हायरसची साथ वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियात चिनी नागरिकांवर वंशद्वेषी हल्ले वाढले आहेत.  यामुळे ऑस्ट्रेलिया चिनी नागरिकांसाठी असुरक्षित बनला असून चिनी नागरिकांनी ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळावा,  अशी सूचना चीनच्या पर्यटन मंत्रालयाने केली आहे. मात्र  ऑस्ट्रेलियात नक्की किती चिनी  नागरिकांवर हल्ले झाले याचे तपशील काही चीनच्या पर्यटन मंत्रालयाने उघड केलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री  बर्मिंगहॅम यांनी चीनचे हे आरोप फेटाळले आहेत. चीन करीत असलेले सारे दावे निराधार आहेत असे ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री सिमन बर्मिंगहॅम यांनी म्हटले आहे.

चीनमधून कोरोनाव्हायरस ऑस्ट्रेलियात दाखल होऊ नये यासाठी ऑस्ट्रेलियाने चिनी नागरिकांच्या ऑस्ट्रेलियातील प्रवासावर बंदी टाकली होती. ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या बचावासाठी हा निर्णय घेणे अनिवार्य होते, असे बर्मिंगहॅम  यांनी म्हटले आहे.  त्यावेळी ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयावर चीनने नाराजी व्यक्त केली होती.  दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या  वादाच्या पार्श्वभूमीवर  ऑस्ट्रेलियाने घेतलेला हा निर्णय चीनला चांगलाच झोंबला होता.

गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात होणारी धोरणात्मक चिनी  गुंतवणूक रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेतले होते.  तसेच ऑस्ट्रेलियावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारने कठोर निर्णय घेऊन चीनला धक्का दिला होता.  याबरोबरच पॅसिफिक महासागरातील चीनच्या कारवायांना पंतप्रधान मॉरिसन यांनी कडवा विरोध करून  भारताबरोबरील सहकार्य वाढविण्याचा व्यूहरचनात्मक निर्णय घेतला आहे. एकाच दिवसापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये परस्परांना एकमेकांचे लष्करी तळ वापरू देण्याबाबतचा करार संपन्न झाला होता.

या कराराला एक दिवस उलटत नाही तोच चीनने आपल्या नागरिकांसाठी ऑस्ट्रेलिया असुरक्षित बनले असे जाहीर करून टाकले आहे.  हा योगायोग नसून याद्वारे ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबरील लष्करी व आर्थिक सहकार्य आपण अत्यंत गांभीर्याने घेतल्याचा संदेश चीन कडून दिला जात आहे. याआधी चीनने ऑस्ट्रेलियातून निर्यात केल्या जाणाऱ्या मांसावर बंदी घातली होती. तर ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये येणाऱ्या गव्हांवरील कर  वाढविला होता.  कोरोनाव्हायरसच्या साथीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्यासाठी चीनने निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

यामुळे ऑस्ट्रेलिया व चीनमधील  तणाव वाढत चालला असून  पुढच्या काळात दोन्ही देश  एकमेकांना याच भाषेत प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply