जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पाठीराखे सुरक्षादलांच्या रडारवर

- १३५ जणांना अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना सहाय्य पुरविणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी सुरक्षादलांनी मोहीम उघडली आहे. यावर्षात आतापर्यंत १३५ जणांना सुरक्षादलांनी अटक केली असून १२५ जणांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

‘ओव्हर ग्राऊंड वर्कर्स’मुळे पीओकेमधून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना लपण्यासाठी ठिकाणे मिळतात. तसेच या पाठिराख्यांमुळे दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पोहोचतात आणि माहितीही मिळते. दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरून काही जण मदत करीत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे सुरक्षादलांनी आता दहशतवद्यांविरोधात कारवाईबरॊबर त्यांना मदत करणाऱ्या या पाठिराख्यांचे ‘जाळे नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

सुरक्षादलांनी अशा संशयीत ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर्स’ची यादी तयार केली असल्याची बातमी आहे. या वर्षी सुरक्षादलांनी १३५ ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर्स’ना अटक केली आहे. तर १२५ संशयीतांवरनजर ठेवण्यात येत असुन लवकरच त्यांची चौकशी होणार आहे. या सर्वांची “ए’ , ‘बी “, ‘सी ‘ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यातील “ए’ वर्गवारीत मोडणाऱ्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात येईल. बी वर्गात मोडणाऱ्यांना गरज पडल्यास अटक होऊ शकते. यासह ‘सी ‘ वर्गात असलेल्यांची चौकशी करून त्यांना इशारा देऊन सोडून देण्यात येईल.

यावर्षी ७८ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे यामध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या २० कमांडर्सचा समावेश आहे. यासह २० दहशतवाद्यांना जिवंत पकड्ण्यात आले आहे.

leave a reply