वृद्धांचे वाढते प्रमाण ही चीनच्या समोरील सर्वात भीषण समस्या

- अमेरिकन विश्लेषकाचा दावा

वृद्धांचे वाढते प्रमाणवॉशिंग्टन – कोरोनाचा उद्रेक आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वीकारलेली ‘झिरो कोव्हिड पॉलिसी’ याचे भयंकर परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत. म्हणूनच यावर्षी चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ३ टक्के इतकाच असेल. चीनच्या सरकारने निर्धारित केलेल्या ५.५ टक्के विकासदराचे ध्येय हा देश यावर्षी गाठू शकणार नाही. ही गेल्या ४० वर्षात चीनने नोंदविलेली दुसऱ्या क्रमांकाची वाईट कामगिरी ठरते. याच्या आधी कोरोनाची साथ भरात असताना २०२० साली चीनच्या अर्थव्यवस्थेने याहूनही वाईट कामगिरी केली होती. पण कोरोनामुळे घसरत असलेली अर्थव्यवस्था हे काही चीनच्या समोरील सर्वात मोठे आव्हान ठरत नाही. तर चीनची समस्या याहूनही कितीतरी अधिक भयावह आहे. तरुणांचे घटत चाललेले प्रमाण आणि वयोवृद्धांची वाढती संख्या, तसेच घटलेला जन्मदर या चीनच्या अधिक भयंकर समस्या असल्याचे समोर येऊ लागले आहे.

वृद्धांचे वाढते प्रमाणविख्यात अमेरिकी स्तंभलेखक डॉयल मॅक्‌‍मॅन्यूस यांनी चीनसमोर खड्या ठाकलेल्या भीषण समस्येवर नेमके बोट ठेवले आहे. चीनमधील बेरोजगारी सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे. युक्रेनच्या युद्धामुळे इंधनाचे दर कडाडल्याने त्याचे विपरित परिणाम चीनची अर्थव्यवस्था झेलत आहे. मागणी विचारात न घेता चीनने कितीतरी मोठ्या प्रमाणात घरे उभारून आपल्या अर्थव्यवस्थेला धोक्यात टाकले आहे. अशात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे चीनचे उत्पादन क्षेत्र बाधित झाले आहे. ही सारी आव्हाने समोर असतानाच, चीनच्या जनतेमधील तरुणांची घटत चाललेली व वृद्धांची वाढती संख्या हा या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न ठरतो, असा दावा मॅक्‌‍मॅन्यूस यांनी केला.

या शतकाच्या अखेरपर्यंत चीनची जनसंख्या १.४ अब्जवरून ८० कोटीपर्यंत घसरेल. काही तज्ज्ञ तर चीनची जनसंख्या याहूनही अधिक झपाट्याने कमी होईल, असे दावे करीत आहेत, याकडे मॅक्‌‍मॅन्यूस यांनी लक्ष वेधले. २०५० सालापर्यंत चीनची २५ टक्के जनसंख्या ६५ वर्षंच्या पुढे गेलेली असेल. यामुळे पुढच्या तीन दशकांपर्यंत चीनचा विकासदर हा तीन टक्क्यांच्या आसपास राहिल, असा निष्कर्ष ऑस्ेलियाच्या लॉव्ही इन्स्टीट्यूटच्या अहवालात नोंदविण्यात आला होता, याची आठवण मॅक्‌‍मॅन्यूस यांनी करून दिली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चीनच्या नेत्यांनाही आपल्या देशाची घसरण सुरू असल्याचे कळून चुकले आहे, असा दावा मॅक्‌‍मॅन्यूस यांनी केला आहे.

वृद्धांचे वाढते प्रमाणयामुळेच चीनची राजवट पुढच्या काळात अधिकाधिक आक्रमक धोरण स्वीकारू शकते, या धोक्याकडे मॅक्‌‍मॅन्यूस यांनी लक्ष वेधले. याच कारणामुळे चीन आपल्या जवळपास सर्वच शेजारी देशांबरोबरील वाद छेडून युद्धाचीही जोखीम पत्करायला तयार झाला आहे. कारण आपले सामर्थ्य कमी होण्याच्या आधी या साऱ्या हालचाली करणे भाग असल्याची जाणीव चीनच्या नेत्यांना झालेली आहे, असे विश्लेषकांनी बजावलेले आहे. मॅक्‌‍मॅन्यूस यांनी त्यांनी नोंदविलेल्या या निष्कर्षाचीही आठवण करून दिली.

यामुळे पुढच्या काळात चीन तैवानबाबत अधिक आक्रमक धोरण स्वीकारू शकेल. अमेरिकेबरोबर युद्धाचा धोका देखील पत्करू शकेल. म्हणूनच चीनची शक्ती कमी होत असली तरी या देशामुळे जगासमोर खडे ठाकत असलेले आव्हान बदलणार नाही, केवळ त्याच्या स्वरुपात बदल होईल, असा दावा मॅक्‌‍मॅन्यूस यांनी केला आहे.

leave a reply