युरोपिय महासंघातील मंदीचा अमेरिकेला फायदा होईल

- अमेरिकी दैनिकाच्या लेखातील दावा

अमेरिकेला फायदावॉशिंग्टन – युरोपात मंदी आल्यास त्याचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, उलट झाला तर फायदाच होईल, असा दावा अमेरिकी दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या लेखात करण्यात आला आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या वाईट असून युरोपिय देशांमध्ये मंदी आल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असे डीन बेकर या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात युक्रेनच्या युद्धामुळे आपल्या युरोपिय प्रतिस्पर्धी देशांचा, त्यातही जर्मनीसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावणे, हेच अमेरिकेचे ध्येय होते, असा लक्षवेधी दावा अमेरिकी अर्थतज्ज्ञ मायकल हडसन यांनी केला होता.

अमेरिका व युरोपिय देशांनी निर्बंध लादल्यानंतर, रशियाला त्याचा फायदाच झाल्याचे दिसून येत आहे. पाश्चिमात्यांच्या उत्पादनांची आयात करण्याच्या ऐवजी रशिया आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे. रशियाच्या इंधनावर निर्बंध लादण्याचा निर्णय अमेरिका व पाश्चिमात्यांनी घेतला. यामुळे रशियाला इंधनाच्या निर्यातीतून मिळणारा महसूल कमी होईल, असा तर्क त्यामागे होता. मात्र कमी प्रमाणात इंधनाची निर्यात करून त्यातून रशिया अधिक कमाई करीत असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेला फायदादुसऱ्या बाजूला कोरोनाची साथ, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी व रशिया-युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम युरोपिय अर्थव्यवस्थेवर होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना व पुरवठा साखळीतील संकटातून बाहेर पडण्यासाठी महासंघाने मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य घोषित केले होते. त्यामुळे अर्थव्यवस्था सावरेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिघडण्यास सुरुवात झाली आहे. रशियावर टाकलेले निर्बंध व इंधनपुरवठा रोखून रशियाने त्याला दिलेले प्रत्युत्तर यामुळे युरोपात इंधन व वीजेचे दर विक्रमी पातळीपर्यंत कडाडले आहेत. इंधनाचे दर भडकल्यामुळे इतर उत्पादनांवरही परिणाम झाला असून युरोपातील महागाई निर्देशांक नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या सर्वांचा परिणाम युरोपिय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून जर्मनी, फ्रान्स व इटलीसारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्था मंदावू लागल्या आहेत. या देशांमधील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला मोठे फटके बसले असून या क्षेत्रातील निर्देशांक नीचांकी पातळीपर्यंत घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक वित्तसंस्थांनी युरोपिय अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भाकिते वर्तविली आहेत. अमेरिका व युरोपची अर्थव्यवस्था जोडलेली असल्याने अमेरिकेतही त्याचे पडसाद उमटण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र अमेरिकी अधिकारी व अर्थतज्ज्ञ त्याचे विशेष परिणाम अमेरिकेवर होणार नाहीत, असे दावे करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply