देशात गेल्या २४ तासात ८६ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर

नवी दिल्ली – गेल्या २४ तासात भारतात कोरोनाव्हायरसमुळे १,०८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोना बळींची संख्या ६९ हजार ५६१ वर पोहोचली आहे. शनिवारी सकाळपर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत ८६ हजार ४३२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी देशात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा उच्चांकही नोंदविण्यात आला आहे. ७० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर महाराष्ट्रात २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत २०,४८९ जणांची भर पडली आहे.

८६ हजार

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवड्याभरात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत देशात विक्रमी ८६,४३२ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे देशात नोंदवल्या गेलेल्या कोरोनाबधितांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात २०,४८९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर १०,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२०,६६१ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.०१ टक्के आहे.

महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४६ टक्के सक्रिय रुग्ण या तीन राज्यांमध्ये आढळले आहेत. तर नोंद झालेल्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी २२ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत. त्याचवेळी गेल्या २४ तासांत देशभरात झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी ५२ टक्के मृत्यू या तीन राज्यांमध्ये झाले असून एकूण बळींपैकी एकट्या महाराष्ट्रात ३५ टक्के बळी गेले आहेत. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे.८६ हजार

केंद्र सरकारने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असून मृत्युदर एक टक्क्याखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, मृत्युदर कमी राखण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर प्रभावी देखरेखीसह जीव वाचवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून कोविड-१९ चाचण्यासंबंधी सुधारीत नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, ऑन-डिमांड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कोणीही कोरोनाची चाचणी करू शकतील.

कोरोनावरील पहिली लस विकसित करण्यात आल्याचा दावा रशियाकडून नुकताच करण्यात आला होता. रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी व सुरक्षित असल्याचा दावा ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाच्या दौऱ्यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासमोर ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीत ही लस सादर करण्यात आली. सध्या भारत-अमेरिकेच्या वैज्ञानिकांचे कोरोनावर संयुक्त संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर भारत-इस्रायलदेखील संयुक्तरित्या लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

leave a reply