भारत-अमेरिका सहकार्यावर अस्वस्थ बनलेल्या चीनची टीका

नवी दिल्ली/बीजिंग – चीनपासून आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करीत असलेल्या भारताच्या मागे अमेरिका ठामपणे उभी राहिल, अशी ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिली आहे. यावर अस्वस्थ झालेल्या चीनने भारत व चीनचा सीमावाद हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगून यात तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपाला वाव नाही, असे म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेची शीतयुद्धकालीन मानसिकता यामुळे जगासमोर आल्याचा दावाही चीनने केला आहे. मात्र चीन भारत आणि अमेरिकेच्या सहकार्याविरोधात दंड थोपटण्याचा आव आणत असला तरी, प्रत्यक्षात चीन या सहकार्यामुळे कमालीचा असुरक्षित बनल्याचे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्रालय तसेच भारतातील चीनच्या दूतावासाने दिलेल्या निवेदनात अमेरिकेवर टीका करण्यात आली आहे. भारत आणि चीनकडे सीमावाद सोडविण्यासाठी लागणारी प्रगल्भता व सामंजस्य आहे. तसेच सीमावाद हा द्विपक्षीय मुद्दा असून यात कुणा तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपाला वाव असूच शकत नाही, अशी आपली भूमिका चीनने या निवेदनाद्वारे मांडली. त्याचवेळी अमेरिका चीनच्या धोक्याचा बागुलबूवा उभा करुन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले वर्चस्व व एकाधिकारशाही कायम राखण्याचा प्रयत्‍न करीत आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला. यामुळे अमेरिकेचा शीतयुद्धकालिन मानसिकतेचा व पूर्वग्रहदुषित विचारसरणीचा पर्दाफाश झाल्याचे दावे चीनने केले आहेत.

भारत आणि अमेरिकेमधील २+२ चर्चेमुळे तसेच उभय देशांमधील ‘बेसिक एक्स्चेंज कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट फॉर जिओ-स्पॅशल कोऑपरेशन’ (बीईसीए) करारामुळे चीन कमालीचा अस्वस्थ बनला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमधील या सहकार्यावर चीनकडून आलेली ही प्रतिक्रिया स्वाभाविक ठरते आहे. विशेषत: गलवानमध्ये शहीद झालेल्या भारताच्या शूर सैनिकांना अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे चीनच्या बेचैनीत अधिकच भर पडल्याचे दिसत आहे. या बरोबरच चीनच्या कारवाया अस्थैर्य माजविणार्‍या असल्याचा अमेरिकेचे संरक्षणमंत्री एस्पर यांनी ठेवलेला ठपकाही चीनला चांगलाच झोंबला आहे. चीनच्या प्रतिक्रियेतून ही बाब उघड होत आहे.

भारतानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ श्रीलंका, मालदिव व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर निघाले होते. त्यांना उद्देशून चीनने अमेरिकेला नवा इशारा दिला आहे. श्रीलंकेला दमात घेण्याचा प्रयत्‍न करू नका, असे चीनने अमेरिकेला बजावले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा आपले डावपेच उधळून लावणारा आहे, याची जाणीव झाल्यानेच चीनकडून अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका एका गटाच्या देशाला दुसर्‍या गटाशी भिडवून आपले राजकारण साधत असल्याचा आरोप चीनकडून करण्यात येत आहे. मात्र आपल्या विरोधात सर्वच देशांना एकत्र येण्यास भाग पाडण्याचे श्रेय दुसर्‍या कुणाही देशाला नसून चीनने आपल्या आक्रमक कारवायांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply