सौदी व इराणचा पाकिस्तानला धक्का

इस्लामाबाद/रियाध/तेहरान – जगभरातील इस्लामी देशांचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणार्‍या तुर्कीबरोबर मैत्री करणार्‍या पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि इराणने धक्का दिला आहे. सौदी व इराणमध्ये भारताच्या विरोधात ‘ब्लॅक डे’ साजरा करण्यासाठी पाकिस्तानचे सुरू असलेले प्रयत्‍न या दोन्ही देशांनी हाणून पाडल्याची माहिती समोर येत आहे. हे अपयश आणि पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तानवर तोंड लपविण्याची वेळ आल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत.

सौदी व इराणचा पाकिस्तानला धक्कापाकिस्तानने काश्मीरसाठी २७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्लॅक डे’ आयोजित करण्याची तयारी केली होती. यासाठी जगभरातील भारतीय दूतावासांसमोर निदर्शने आयोजित करुन भारताविरोधात अपप्रचार करण्याचा डाव पाकिस्तानने आखला होता. पण पाकिस्तानचा हा डाव सपशेल फसला. पाश्चिमात्य देशांप्रमाणे आखाती इस्लामी देशांमध्येही भारताच्या विरोधात ‘ब्लॅक डे’ साजरा करण्याचे नियोजन पाकिस्तानला मागे घ्यावे लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

इराणची राजधानी तेहरानमधील विद्यापीठात भारतविरोधी ‘ब्लॅक डे’ साजरा करण्याचा पाकिस्तानी दूतावासाचा प्रस्ताव इराणच्या सरकारने धुडकावून लावला. पाकिस्तानी दूतावासाला यासंबंधी वेबिनार आयोजित करण्याची परवानगी कशीबशी मिळाली. पण पाकिस्तानी दूतावासाचा वेबिनारचा प्रयत्‍न देखील फारसा यशस्वी ठरला नसल्याचा दावा केला जातो. तर सौदी अरेबियाने रियाधमधील पाकिस्तानी दूतावास आणि जेद्दाहमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाला त्यांच्या इमारतीच्या आवारात देखील हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली नाही. सौदी व इराण या इस्लामी जगताचे नेतृत्त्व करणार्‍या दोन प्रभावशाली देशांनी पाकिस्तानचे भारतविरोधी डाव हाणून पाडले असून यासाठी पाकिस्तानची तुर्कीबरोबरची वाढती मैत्री कारणीभूत असल्याचा दावा केला जातो.

सौदी व इराणचा पाकिस्तानला धक्काइस्लामी देशांचे नेतृत्त्व आपल्याकडे यावे अशी तुर्कीच्या राजकीय नेतृत्त्वाची अपेक्षा आहे व यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पाकिस्तानला हाताशी धरले आहे. इम्रान खान यांचे सरकारही तुर्कीच्या या प्रयत्‍नांना समर्थन देत आहेत. त्यामुळे खवळलेल्या सौदीने पाकिस्तानला जागा दाखविण्यास सुरुवात केली असून पाकिस्तानला दिलेले अब्जावधी डॉलर्सचे कर्ज वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सौदीच्या या विरोधाला पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री कुरेशी यांची बेजबाबदार धोरणे कारणीभूत असल्याची टीका पाकिस्तानमध्ये होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नव्या परराष्ट्र धोरणाने पाकिस्तानचा आत्मघात केला असून तुर्कीबरोबरच्या मैत्रीमुळे पाकिस्तान जूने मित्रदेशही गमावून बसत असल्याची नाराजी पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply