चीनमध्ये सोन्याचे नवे साठे सापडले

- ‘शान्डॉन्ग गोल्ड मायनिंग’ची घोषणा

बीजिंग – चीनच्या पूर्व भागातील ‘शिलिंग गोल्ड माईन’ या खाणीत सोन्याचे अतिरिक्त साठे सापडल्याचे समोर आले आहे. ‘शान्डॉन्ग गोल्ड मायनिंग’ या सरकारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शिलिंगमधील खाणीत अतिरिक्त २०० टन सोने असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत शिलिंगमधील खाणींमध्ये ३८० टनांपर्यंत सोन्याचे साठे असल्याचे सांगण्यात येत होते.

चीन हा जगातील आघाडीचा सोने उत्पादन करणारा देश म्हणून ओळखण्यात येतो. गेल्या वर्षी चीनने ३३० टन सोन्याचे उत्पादन केले होते. जागतिक पातळीवर होणाऱ्या सोन्याच्या एकूण उत्पादनात चीनचा हिस्सा १० टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांनी दोन हजार डॉलर्स प्रति औंसचा (२८.३३ग्रॅम) टप्पा ओलांडला असून ही पातळी कायम राहण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सोन्याच्या नव्या साठ्यांचा शोध लागणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

यापूर्वी मार्च महिन्यातही चीनने सोन्याचे नवे साठे मिळाल्याचा दावा केला होता. रुशान भागात लागलेल्या या शोधामध्ये ५० टन सोन्याचे साठे असल्याचे चिनी यंत्रणांकडून सांगण्यात आले होते. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनने सोन्याच्या उत्खननाचा वेगही वाढविला असून जवळपास ८५ टन सोन्याचे उत्पादन केल्याची माहिती देण्यात आली आहे.

leave a reply