कोरोना उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे चीनच्या आर्थिक विकासदरात घट होईल

- ‘वर्ल्ड बँके’चा अहवाल

आर्थिक विकासदरवॉशिंग्टन/बीजिंग – सातत्याने उद्भवणारे कोरोनाचे उद्रेक व त्याविरोधात लादलेली कठोर ‘झीरो कोविड पॉलिसी’ या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत उलथापालथी सुरू असून त्याचा परिणाम आर्थिक विकासदरावर झाल्याचे ‘वर्ल्ड बँके’ने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, २०२२मध्ये चीनची अर्थव्यवस्था २.७ टक्क्यांपर्यंत घसरणार आहे. तर पुढील वर्षात चिनी अर्थव्यवस्था चार टक्क्यांहून अधिक दर गाठू शकेल, असे भाकित ‘वर्ल्ड बँके’ने वर्तविले आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवरच, चीनमध्ये कोरोनाची नवी लाट येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजधानी बीजिंगसह काही शहरांमध्ये रुग्ण तसेच बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून स्थानिक यंत्रणांनी तात्पुरती हॉस्पिटल्स व इतर सुविधांच्या उभारणीसाठी धडपड सुरू केल्याचे सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे.

आर्थिक विकासदरचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने दोन आठवड्यांपूर्वी ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनच्या बहुतांश भागात त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून ‘मास टेस्टिंग’ व ‘क्वारंटाईन’संदर्भातील बहुतांश नियम शिथिल करण्यात आले आहेत. चिनी नागरिकांना अंतर्गत प्रवासासाठी लादलेले अनेक नियमही रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र धोरण शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याचे वृत्त समोर येत आहे.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या काही हजारांमध्ये असल्याचे दावे करण्यात येत आहेत. रुग्णसंख्येबरोबरच कोरोनामुळे दगावणाऱ्यांची आकडेवारीही मोठी असून शहरातील दफनभूमींमध्ये जागा शिल्लक नसल्याची माहिती काही माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. मात्र चिनी यंत्रणा याबाबत उघडपणे काहीच सांगण्यास तयार नसून सामान्य नागरिकांसह परदेशी कंपन्या, पर्यटक तसेच गुंतवणुकदारांमध्ये पुन्हा अस्वस्थता वाढू लागली आहे. वर्ल्ड बँकेचा नवा अहवाल याला दुजोरा देणारा ठरला असून यात ‘झीरो कोविड पॉलिसी’बरोबरच कोरोनाचे उद्रेक तसेच चीनच्या उद्योगक्षेत्राला बसलेल्या धक्क्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. चीनने ‘झीरो कोविड’चे धोरण शिथिल केले असले तरी अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला अहवालात देण्यात आला. लसीकरण व आरोग्य सेवा मजबूत करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वर्ल्ड बँकेने बजावले आहे.

आर्थिक विकासदरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या राजवटीने घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला फटके बसल्याची जाणीवही करून देण्यात आली. या फटक्यांमुळे २०२२मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची २.७ टक्क्यांपर्यंत घसरण होईल, याकडे वर्ल्ड बँकेने लक्ष वेधले. पुढच्या वर्षी स्थितीत काही प्रमाणात सुधारणा शक्य असून विकास दर चार टक्क्यांच्या वर जाईल, असे भाकितही वर्तविण्यात आले आहे. ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’ तसेच सामाजिक क्षेत्रावर अधिक खर्च करणे आवश्यक असल्याचे आवाहन वर्ल्ड बँकेने केले आहे.

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) चीनला गंभीर इशारा दिला होता. ‘ज्या देशात अतिशय कठोर निर्बंध लादलेले असतात अशा देशाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कठीण परिस्थितीला तोंड द्यावेच लागते. पुढील काळात चीनलाही अतिशय अवघड व कठीण स्थितीला सामोरे जावे लागेल’, असे ‘डब्ल्यूएचओ’ने बजावले होते.

leave a reply