चीनने लडाखच्या एलएसीवरील तैनाती अधिकच वाढविली

लडाखच्या एलएसीवरीलनवी दिल्ली – काहीही झाले तरी भारत चीनला एलएसीवरील यथास्थिती एकतर्फी कारवाईद्वारे बदलू देणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी म्हटले होते. चीनने लडाखच्या एलएसीवरील लष्करी तैनाती ७० हजार जवानांवर नेल्याची बाब समोर येत असतानाच, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलेल्या या विधानाचे महत्त्व वाढले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान आणि चीनने लडाखच्या एलएसीवरील तैनाती वाढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून एलएसीवरील परिस्थिती संवेदनशील बनल्याचे दावे केले आहेत.

९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरच्या एलएसीवरील यांगत्से भागात चीनच्या ३०० जवानांनी घुसखोरी केली होती. या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी अद्दल घडविल्यानंतर चीनने त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. भारताने आपल्या सैन्याला आवरावे अशी मागणी चीनच्या लष्करी अधिकाऱ्याने केली होती. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एलएसीवरील परिस्थिती स्थिर असल्याचे दावा केला होता. याच्या पलिकडे जाऊन चीनने या विषयावर अधिक बोलण्याचे नाकारले. भारतात एलएसीवरील परिस्थितीबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असताना, चीन या विषयावर बोलण्याचे टाळत आहे, ही लक्षणीय बाब ठरते. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मात्र यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली असून संसदेतही यासंदर्भातील सरकारची भूमिका नेमक्या शब्दात मांडली होती.

भारताचे चीनबरोबरील संबंध सामान्य पातळीवर नाहीत, हे भारत उघडपणे जगाला सांगत आहे, असे जयशंकर यांनी संसदेत म्हटले होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत बळाचा वापर करून चीनला एलएसीवरील यथास्थिती बदलू देणार नाही, अशी ग्वाही जयशंकर यांनी दिली होती. तवांग सेक्टरच्या यांगत्से येथील एलएसीवर भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षावर बोलताना जयशंकर यांनी हे आश्वासन दिले. पण केवळ अरुणाचल प्रदेशच्याच एलएसीवर नाही, तर लडाखमध्येही चीनने प्रचंड प्रमाणात तैनाती वाढविल्याची बाब केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे.

चीनने लडाखच्या एलएसीवर आपले ७० हजार जवान तैनात केले आहेत. २०२० साली झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनने लडाखच्या एलएसीवरील आपल्या जवानांची तैनाती ५० हजारावर नेली होती. आता इथल्या जवानांची संख्या ७० हजारांवर नेऊन चीन भारतावरील दडपण वाढविण्याचे नवे प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले आहे. मात्र भारतीय लष्करानेही तोडीस तोड तैनाती करून चीनला या आघाडीवर प्रत्युत्तर दिले आहे. इथल्या हवामानाचा अनुभव व सराव असलेल्या भारतीय सैनिकांसमोर चीनच्या लष्कराचा अनुभव तोकडा पडत असल्याचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे चीनने वाढविलेल्या या लष्करी तैनातीची दखल भारताने घेतली असली, तरी त्याचे दडपण भारतीय सैन्यावर येत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply