चीन हॉंगकॉंगमधील लोकशाही संपवित आहे – आंतरराष्ट्रीय समुदायाची टीका

चीन हॉंगकॉंगमधील लोकशाही संपवित आहे – आंतरराष्ट्रीय समुदायाची टीका

हॉंगकॉंग – कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या आड हॉंगकॉंगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने १४ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. हॉंगकॉंग प्रशासनाच्या या कारवाईवर अमेरिका, ब्रिटन आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी संताप व्यक्त केला. हॉंगकॉंगमधील लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना अटक करुन चीन येथील लोकशाही संपविण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका या देशांकडून तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून केली जात आहे.

हॉंगकॉंगच्या पोलिसांनी शनिवारी शहरात केलेल्या कारवाईत १४ जणांना अटक केली. गेल्या वर्षी हॉंगकॉंगमधील प्रशासनाविरोधात भडकलेल्या निदर्शनांचे नेतृत्व केल्याचा तसेच चीनच्या विरोधात वातावरण भडकविण्याचा ठपका या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर ठेवला आहे. त्याचबरोबर कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाउनचे नियम मोडून निदर्शकांना जमा केल्यामुळे ही कारवाई केल्याचा खुलासा हॉंगकॉंगच्या प्रशासनाने केला. अटक झालेल्यांमध्ये विद्यार्थी, वकील, लेखक, पत्रकार आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे.

हॉंगकॉंगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने लोकशाही समर्थकांवर केलेल्या या कारवाईवर जगभरातून टीका होत आहे. ‘चीन आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्या बेकायदेशीर कारवाईने हॉंगकॉंगचे सार्वभौमत्व संकटात टाकत आहेत’, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. तर लोकशाहीवाद्यांना अटक करुन, चीनने १९९७साली ब्रिटनबरोबर केलेल्या कराराचे आणि हॉंगकॉंगमधील लोकशाहीचे उल्लंघन केल्याचा आरोप ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तर कोरोनाव्हायरसच्या साथीच्या आड चीनने लोकशाहीवादी नेत्यांना अटक करण्याची संधी साधल्याचे ताशेरे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मेरी पेन यांनी ओढले आहेत.

दरम्यान, ही अटक म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याची टीका ‘इंटरनॅशनल बार असोसिएशन’ने केली. त्याचबरोबर या साथीमुळे हॉंगकॉंगमध्ये लागू केलेल्या निर्बंधांच्या आड चीन लोकशाही समर्थकांवरील कारवाई वाढविल, अशी चिंता काही विश्लेषकांनी व्यक्त केली. वेळीच चीन व हॉंगकॉंगच्या प्रशासनाच्या या कारवाईचा विरोध केला नाही तर हॉंगकॉंगमधील लोकशाही संपुष्टात येईल, असा इशारा हे विश्लेषक देत आहेत.

leave a reply