प्रत्येक अमेरिकी नागरिकाचे डॉसिअर करण्याइतका अमेरिकेचा डाटा चीनने सायबरहल्ल्याद्वारे चोरला आहे

- माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर यांचा आरोप

डॉसिअरवॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून अमेरिकेतील माहिती प्रचंड प्रमाणात चोरली आहे. या माहितीतून चीनची राजवट प्रत्येक अमेरिकी नागरिकाचे स्वतंत्र ‘डॉसिअर’ तयार करु शकेल, असा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर यांनी केला आहे. पॉटिंगर यांनी ट्रम्प प्रशासनाची ‘चायना पॉलिसी’ आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर यांची नुकतीच अमेरिकेच्या संसदेसमोर सुनावणी झाली. या सुनावणीत त्यांनी चीनची राजवट सायबरहल्ल्यांचा कसा वापर करीत आहे, याकडे लक्ष वेधले. ‘लोकांची माहिती जमा करून त्याचे डॉसिअर बनविणे ही डाव्या लेनिनवादी राजवटींची खासियत आहे. मात्र ५जी तंत्रज्ञानासारख्या डिजिटल नेटवर्क्सचा वापर करून चीनने ही गोष्ट अधिकच गंभीर पातळीवर नेऊन ठेवली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने जगभरातील कोट्यावधी परदेशी नागरिकांची डॉसिअर्स तयार केली आहेत. त्याचा वापर प्रभाव टाकण्यासाठी, लक्ष्य करण्यासाठी, दडपण आणण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी तसेच जिंकण्यासाठी केला जातो’, असा आरोप पॉटिंगर यांनी केला.

डॉसिअरचीनच्या राजवटीने अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाचे डॉसिअर तयार करण्याइतकी प्रचंड व संवेदनशील प्रकारातील माहिती मिळविली आहे. चिनी राजवटीने अमेरिकेतील मुलांनाही सोडलेले नाही. कम्युनिस्ट राजवटीच्या राजकीय युद्धाच्या धोरणात या गोष्टीलाही योग्य ठरविण्यात आले आहे’, असे अमेरिकेच्या माजी सुरक्षा उपसल्लागारांनी बजावले. पॉटिंगर यांच्या या वक्तव्यांवर चिनी प्रसारमाध्यमांकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या सरकारी मुखपत्राने पॉटिंगर यांचे वक्तव्य म्हणजे शीतयुद्धकालिन मानसिकतेचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी जे आरोप चीनच्या राजवटीवर करण्यात येत आहेत, ते प्रत्यक्षात अमेरिकेनेच जगातील इतर देशांविरोधात केले आहे, असा दावाही करण्यात आला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुद्यांवरून चीनविरोधात आक्रमक मोहीम छेडली होती. बायडेन प्रशासनाने त्याची तीव्रता कमी केली असली, तरी विरोधी पक्ष व अमेरिकी जनतेच्या दडपणामुळे अनेक मुद्यांवर ट्रम्प यांची आक्रमक चीनविरोधी धोरणे कायम ठेवणे बायडेन प्रशासनाला भाग पडत आहे. सायबरहल्ल्यांचा मुद्दा त्यापैकीच एक ठरतो. गेल्याच महिन्यात बायडेन प्रशासनाने ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेंज सर्व्हर’वरील हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचा ठपका ठेवला होता. त्यापाठोपाठ चीनच्या सत्ताधारी राजवटीचे समर्थन असलेल्या हॅकर्सनी अमेरिकेतील इंधनवाहिनींवर सायबरहल्ले चढविले होते, असा दावाही अमेरिकी यंत्रणांनी केला होता.

अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते व अधिकारी चीनवर तसेच बायडेन प्रशासनावरही गंभीर आरोप करून दडपण वाढवित आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी चीनला अमेरिकेवर आता सायबरहल्ले चढविण्याची आवश्यकताच उरलेली नाही, असा दावा केला होता. कारण बायडेन प्रशासन चीनला हवी ती संवेदनशील माहिती तबकात सजवून त्याचा नजरणा चीनला पेश करील, अशी जळजळीत टीका हॅले यांनी केली होती.

leave a reply