चीनला कोरोनाव्हायरसची किंमत चुकती करावीच लागेल

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसची माहिती दडवून चीनने अमेरिकेची जबर जीवित आणि आर्थिकहानी केली आहे. या हानीची चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला किंमत चुकती करावीच लागेल’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. ही किंमत आर्थिक आणि व्यापारी स्तरावर असेल, असे स्पष्ट संकेत परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिले आहेत. अमेरिकेप्रमाणेच कोरोनाव्हायरसमुळे फार मोठे नुकसान सोसावे लागलेले इतर देश देखील चीनवर हा ठपका ठेवून प्रचंड रकमेच्या नुकसानभरपाईची मागणी करू शकतात. ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलियाने तसे संकेतही दिले आहेत.

जगावर कोसळलेल्या कोरोनाव्हायरसच्या संकटाला सर्वथा चीनच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी पुन्हा एकदा केला. ‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टी आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी या साथीची माहिती जगापासून लपवून ठेवली. आजही या साथीच्या उगमाबाबत जगाला काहीही माहित नाही आणि हा फार मोठ्या चिंतेचा विषय ठरतो’, असा घणाघाती हल्ला पॉम्पिओ यांनी चढविला. चीनने महिनाभर या साथीची माहिती आपल्या जनतेपासून लपवून ठेवली व चिनी नागरिकांमुळे जगभरात कोरोनाव्हायरसचा फैलाव झाला, असा ठपका परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ठेवला.

‘चीनमुळे अमेरिकेला सोसाव्या लागलेल्या भयंकर हानीचे परिणाम चीनला भोगावेच लागतील. या साथीच्या प्रभावातून अमेरिका पूर्णपणे बाहेर येईल, तेव्हा या साथीमुळे सहन कराव्या लागलेल्या जीवित आणि आर्थिकहानीची किंमत चीनला चुकती करावीच लागेल. यापुढे औषधांची निर्मिती आणि इतर गोष्टींसाठी अमेरिका चीनवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल’, असे सांगून पॉम्पिओ यांनी चीनबरोबर व्यापारी सहकार्य पहिल्यासारखे राहणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तसेच अमेरिकेचे लोकप्रतिनिधी कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेत थैमान घालत असताना त्याचे परिणाम चीनला सहन करावे लागतील, असे इशारे सातत्याने देत आहेत. एखाद्या युद्धात सोसावी लागणार नाही, इतकी भयंकर जीवितहानी व आर्थिक नुकसान अमेरिकेला कोरोनाव्हायरस साथीमुळे सहन करावे लागले आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या अमेरिकेच्या युरोपीय मित्रदेशांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. जपान, ऑस्ट्रेलिया हे देश देखील कोरोनाव्हायरस मागे चीनचे कटकारस्थान असल्याचा संशय वेगवेगळ्या शब्दात व्यक्त करीत आहेत.

लवकरच हे सारे देश एकजुट करून चीनच्या विरोधात फार मोठी राजनैतिक आघाडी उघडतील व चीनकडून जबर नुकसानभरपाई वसूल केल्याखेरीज शांत बसणार नाहीत, असा दावा काही विश्लेषकांकडून केला जात आहे. चीनने अमेरिका व मित्रदेशांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला, तर संघर्ष अटळ असेल व हा संघर्ष वेगवेगळ्या पातळीवर सुरू होईल, असा दावा या विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply