चीनने कोरोनाची माहिती जगापासून दडवली

-हॉंगकॉंगच्या महिला संशोधिकेचा आरोप

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसचा फैलाव मानवी संक्रमणातून होतो, याची पूर्ण माहिती चीनला होती. ही माहिती उघड करुन कित्येकांची जीव वाचविता आला असता. पण चीनने ही माहिती जगापासून दडवून ठेवली. चीन किंवा हॉंगकॉंगमधील माध्यमांसमोर याबाबत तोंड उघडले असते तर, माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता. कारण, चीनची राजवट सत्य सांगणाऱ्यांशी कसे वागते, हे मला माहित आहे. म्हणूनच कोरोनाचे सत्य जगासमोर मांडण्यासाठी मी अमेरिकेत धाव घेतली’, असे जाहीर करुन हॉंगकॉंगच्या विद्यापीठातील संशोधिका ‘डॉ. ली-मेंग यान’ यांनी जगभरात नवी खळबळ माजविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत आश्रयाला असलेल्या डॉ. ली यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना ही सारी माहिती उघड केली.

चीनने कोरोनाची माहिती जगापासून दडवलीचीनच्या क्विंगदाओ प्रांतात जन्म झालेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून हॉंगकॉंगच्या ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या वैद्यकीय विद्यापीठात संशोधिका म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर ली यांनी, ‘फॉक्स न्यूज’ या अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना चीन कोरोनाचे सत्य लपवीत असल्याचा ठपका ठेवला. चीनच्या राजवटीबरोबरच या देशातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच संशोधकांनाही या साथीच्या फैलावाची मुख्य कारणे माहीत होती. तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या साथीचा इशारा देणारा अहवाल आपण वरिष्ठांकडे सोपविला होता. पण वरिष्ठांनी माझे संशोधन दुर्लक्षित केले आणि याबाबत शांत राहण्याचा सल्ला दिला, असे डॉ. ली यांनी म्हटले आहे.

कोरोनाव्हायरस विषयीच्या या संशोधनात मला चीनमधील काही डॉक्टर मित्रांनी मदत केली होती. या साथीचा फैलाव मानवी संक्रमणातून होत असल्याची माहिती या डॉक्टर मित्रांनीच मला दिली होती. मात्र आमची नावे उघड करू नको, अशी अट या मित्रांनी ठेवली होती. यापैकी काही मित्रांना पुढच्या काही दिवसात अटक करण्यात आली, तर काही मित्र गायब झाले. हॉंगकॉंगच्या विद्यापीठातील माझ्या वरिष्ठांनी देखील मला रेड लाईन ओलांडू नकोस, असे बजावले. रेड लाईन म्हणजे चीनच्या सरकारचा उलेख कुठेही करू नकोस, असा इशारा माझ्याच वरिष्ठांनी मला दिला होता. चीनच्या राजवटीबाबतचे सत्य जगासमोर मांडणाऱ्यांशी चीनमध्ये कसे व्यवहार केले जातात, त्यांचा आवाज कसा दाबला जातो, ते कसे गायब होतात, हे माहीत असल्यामुळे आपण अमेरिकेसाठी धाव घेतली, अशी माहिती डॉक्टर ली यांनी यावेळी दिली.

अमेरिकेत आश्रय घेतल्यानंतर चीनकडून माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. हॉंगकॉंगच्या विद्यापीठात मी केलेले सारे संशोधन नष्ट केले जात असून माझ्या संकेतस्थळावर सायबर हल्ले चढविले जात आहेत. इतकेच नाही तर क्विंगादाओमध्ये राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांनाही चिनी राजवटीकडून त्रास दिले जात आहे. मी चीनमध्ये परत जावे यासाठी माझ्या आई-वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पण चीनमध्ये परत गेले तर जिवंत राहणार नाही. आजवर चीनबाबतचे सत्य जगासमोर मांडणारी एकही व्यक्ती सुखरुप राहिलेली नाही’, याची आठवण डॉक्टर ली यांनी करून दिली.

दरम्यान, चीन सरकार आणि हॉंगकॉंगच्या विद्यापीठाने डॉ. ली यांचे आरोप फेटाळले आहेत. मात्र चीनने कोरोनाची माहिती दडविल्याचा आरोप करणाऱ्या डॉ. ली-मेंग यान या पहिल्या नसून याआधी चीनच्या वुहान शहरातील डॉक्टर, संशोधक, लेखक, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याआधी असेच आरोप केले आहेत. यातील काही जण संशयास्पदरित्या बेपत्ता झाले असून यामध्ये कोरोनाबबतची खरी माहिती उघड करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे दावे केले जातात.

leave a reply