आंतरराष्ट्रीय दडपणामुळे चीनने कोरोनाच्या बळींची संख्या १२९० ने वाढविली

वुहान/वॉशिंग्टन – चीनने आपल्या वुहान प्रांतातील बळींची संख्या ५० टक्क्यांनी वाढल्याचे प्रसिद्ध केले. यामुळे वुहानमधील बळींची संख्या तब्बल १२९० नी वाढली. या मृतांची मोजणी राहून गेले, अशी सारवासारव चीनने केली आहे. पण प्रत्यक्षात चीन कोरोनाने बळी गेलेल्यांच्या संख्येत लपवाछपवी करीत असल्याचे आंतरराष्ट्रीय आरोप तीव्र झाल्यानेच या देशाला ही माहिती उघड करावी लागल्याचे दिसते. मात्र या प्रकरणानंतर चीनवर रोखलेल्या आरोपांच्या तोफा अधिकच धडाडणार असल्याचे दिसत आहे.

चीन सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नव्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसच्या साथीने या देशात ४६३२ जणांचा बळी घेतला असून यात शुक्रवारी घोषित केलेल्या १२९० मृतांचा समावेश करण्यात आला आहे. तर चीनमध्ये या साथीच्या ३५१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आता या देशात ८२,६९२ जणांना या साथीची लागण झाली आहे. असे असले तरी, वुहानमधील एकूण बळींची संख्या ६० हजार ते दोन लाखांपर्यंत असल्याचे दावे वुहानमधील नागरिकांनी तसेच चीनमधील काही संकेतस्थळांनी केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चीन बळींची खरी माहिती दडवित असल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकसह ब्रिटन, जपान आणि तैवान तसेच आंतरराष्ट्रीय निरिक्षकांनी केलेले हे आरोप चीनने फेटाळले होते. आता चीनमध्ये नव्याने दाखल झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या दुसऱ्या साथीबाबतही असेच आरोप सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस वुहानसह चीनच्या इतर भागात कोरोनाची नवी लाट मानल्या जाणाऱ्या नव्या साथीचा फैलाव वाढत आहे. आतापर्यंत या नव्या साथीच्या हजार रुग्णांची नोंद झाली असून चीनच्या सरकारने जनतेवर पुन्हा लॉकडाउन घोषित केले आहेत. पण चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने सुरुवातीचे सहा दिवस आपल्या जनतेला या साथीबाबत अंधारात ठेवले, असे आरोप केले जातात.

दरम्यान, कोरोनाव्हायरसचा फैलाव वुहानमधूनच झाला, ही साथ म्हणजे चीनच्या जैविक हल्ल्याचा भाग असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. वुहानच्या एका सरकारी प्रयोगशाळत या साथीचे विषाणू तयार केले गेले, असे आरोपही करण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘चायनीज व्हायरस’ अशी टिप्पणीही केली होती. या आरोपांची चौकशी करण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटने विशेष समितीची स्थापना केली आहे. पण यामुळे भांबावलेल्या चीनने सदर साथीचा संबंध वुहानमधील प्रयोगशाळेशी नाही, जागतिक आरोग्य संघटनेने तसा निर्वाळा दिल्याचे सांगून आपला बचाव सुरु केला आहे.

leave a reply