अफगाणी सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताचे कारस्थान उधळले

बगदाद – अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी तालिबानच्या तळावर केलेल्या हल्ल्यांमध्ये पंधरा दहशतवादी ठार झाले यामध्ये पाच तालिबानी तर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहा दहशतवाद्यांचा समावेश आहे. तसेच जैशच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात अफगाणी सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले. इथे तालिबानचे दहशतवादी जैशच्या सदस्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घातपात माजविण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी केलेली ही कारवाई पाकिस्तान व पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयला फार मोठा धक्का देणारी ठरते.

अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील मोहम्मद डेरा भागात हा ट्रेनिंग कॅम्प सुुुरू होता. १३ व १४ एप्रिल रोजी अफगाणी लष्कर आणि तालिबान यांच्यामध्ये या भागात जोरदार चकमक उडाली. या संघर्षात १५ दहशतवादी ठार झाले तर ४ अफगाणी सैनिक मारले गेले. मारल्या गेलेेल्या दहशतवाद्यांमध्ये ५ तालिबानी तर जैशच्या दहा दहशतवाद्यांचा समावेश असून यात जैशच्‍या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. या चकमकीचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. या कारवाईत अफगाणी लष्कराने २ मॉर्टर्स लॉंचर, १ रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड आणि एके रायफल्स जप्त केल्या आहेत. या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी ट्रेनिंग दिले जात होते, अशी माहिती अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणानी दिली आहे.

अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची तयारी करीत असून यासाठी अमेरिकेने तालिबानबरोबर शांती चर्चा सुरू केली होती. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तान तालिबानच्या हातात जाईल, असे भाकीत वर्तवून पाकिस्तानी लष्कराचे विश्लेषक व कट्टरपंथीय यावर कमालीचा आनंद व्यक्त करीत होते पुढच्या काळात अफगाणिस्नतानावरील भारताचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करून, या देशाचा भारताच्या विरोधात वापर करण्याची स्वप्ने पाकिस्तानचे लष्कर पाहू लागले होते. या दिशेने पाकिस्तानचे लष्कर व कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने तयारी देखील सुरू केली होती यासाठी तालिबानमधील हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी कामाला लागल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

यामुळेच तालिबानचे दहशतवादी त्यातही हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानातील भारतीय हितसंबंधांवर दहशतवादी हल्ल्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. काही दिवसांपूर्वी काबुलमधील शीख धर्मीयांच्या गुरुद्वारावर झालेला भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी घडवून आणला असल्याचे उघड झाले होते आता नांगरहार येथील तालिबानच्या प्रशिक्षण केंद्रात जैशचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घातपात घडविण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे पाकिस्तानच्या कुटील कारस्थानाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.

यामुळे पाकिस्तानची आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. मुख्य म्हणजे अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी या कटाची माहिती उघड करून पाकिस्तानवरील दबाव प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. जिवंत सापडलेल्या जैशच्या दहशतवाद्याकडून पाकिस्तानच्या या कटकारस्थानाबद्दलची अधिक माहिती उघड झाली तर त्याचे फार मोठे परिणाम या देशाला सहन करावे लागू शकतात. म्हणूनच अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या या कारवाईचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

leave a reply