आखाती व आफ्रिकी देशांमधील चीनचा प्रभाव वाढला, तर अमेरिकेचा घटला

- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

आखाती व आफ्रिकीन्यूयॉर्क – कधीकाळी अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेले आखाती व आफ्रिकी देश आत्ता अमेरिकेपासून दुरावत चालले आहेत. या देशांवरील अमेरिकेच्या प्रभावात थोडीथोडकी नाही, तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. याचा फायदा घेत असलेल्या चीनचा आखाती व आफ्रिकी देशांमधील प्रभाव वाढल्याचा इशारा ‘युरेशिया ग्रुप फाऊंडेशन’ या अभ्यासगटाने दिला. यासाठी अमेरिकेची अफगाणिस्तानविषयक भूमिका तसेच परराष्ट्र धोरण यासाठी जबाबबदार असल्याचा दावा या अमेरिकन अभ्यासगटाने केला.

गेल्या दशकभरात आखाती व आफ्रिकी देशांबरोबरील अमेरिका व चीनच्या व्यापाराचे तपशील सदर अभ्यासगटाने दिले. २०१० साली चीन व आफ्रिकेतील व्यापार ११४ अब्ज डॉलर्स इतका होता. पण गेल्या वर्षी हाच व्यापार २५४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. पण अमेरिका आणि आफ्रिकेतील व्यापारात घट झाल्याकडे या अभ्यासगटाने लक्ष वेधले.

फक्त व्यापारच नाही तर आफ्रिकी देशांमधील अमेरिका व चीनबाबत असलेल्या भूमिकेतही मोठा बदल झाला आहे. आफ्रिका खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नायजेरियामध्ये २०१० साली ८१ टक्के लोकसंख्या अमेरिकेच्या बाजूने होती. तर २०१९ साली अमेरिकेसाठी असलेल्या समर्थनात १९ टक्क्यांची कपात झाली. आफ्रिकन उद्योगक्षेत्र व जनता सध्या चीनकडे भरवशाचा गुंतवणूकदार पाहत असल्याचा दावा या अभ्यासगटाने केला.

आखाती देशांमधील जॉर्डन या अमेरिकेच्या सहकारी देशातील अधिकाधिक जनता चीनपेक्षा अमेरिकेकडेच धोका म्हणून पाहत आहे. आखाती देशांमध्ये तीव्रपणे अमेरिकेच्या विरोधात नकारात्मक दृष्टीकोन तयार झाला असून यासाठी अफगाणिस्तानबाबतची भूमिका जबाबदार असल्याचा दावा या अभ्यासगटाने विश्‍लेषकांच्या हवाल्याने केला. त्याचबरोबर अमेरिकेची परराष्ट्र भूमिका ढोंगीपणाने भरलेली असल्याचा समज आखाती देशांमध्ये पसरत चालल्याचे या अभ्यासगटाने लक्षात आणून दिले.

आखाती व आफ्रिकीअमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे आखाती आणि आफ्रिकी देशांबरोबर निर्माण झालेल्या अविश्‍वासाची जागा चीन घेत आहे. यासाठी अमेरिकेची धोरणे जबाबदार असल्याचा दावा आखात व आफ्रिका विषयीचे विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिका नेहमीच लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकारांच्या मुद्यावर आग्रही राहिली आहे. आपल्याशी सहकार्य करणार्‍या देशांनी देखील या चौकटीत रहावे, अशी अमेरिकेची इच्छा असते.

पण चीन कधीच आपल्याशी सहकार्य करणार्‍या देशांना लोकशाही किंवा हुकूमशाहीच्या नियमांशी बांधिल ठेवत नाही, असे अमेरिकेने लक्षात आणून दिले. याशिवाय चीनकडे स्वस्त बाजारपेठ उपलब्ध असल्याचेही या अभ्यासगटाने म्हटले आहे. याचा फायदा चीनला होत असून अमेरिकेचा प्रभाव घटत चालल्याचा दावा ‘युरेशिया ग्रुप फाऊंडेशन’ने केला.

leave a reply