कमकुवत अणुकरार इराणला मजबूत करील

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

मजबूतजेरूसलेम – ‘अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारून इराण अल्पकाळासाठी नव्या अणुकरारावर सहमत होईल. पण हा करार २०१५ सालच्या मूळ अणुकरारापेक्षाही कमकुवत असेल आणि यामुळे इराण अधिकच मजबूत होईल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. या अणुकरारामुळे इस्रायलसह या क्षेत्रातील अमेरिकी जवानांची सुरक्षा देखील धोक्यात येईल, याची आठवण इस्रायलच्या पंतप्रधानांनी करुन दिली.

गेल्या आठ महिन्यांपासून व्हिएन्ना येथे इराणबरोबरच्या अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचा दावा अमेरिकेचे बायडेन प्रशासन करीत आहे. इराणने गंभीरपणे विचार केला तर येत्या काही दिवसात अणुकरार संपन्न होईल, असे दावे बायडेन प्रशासन करीत आहे. युरोपिय महासंघाने देखील अणुकरार दृष्टीपथात असल्याचे म्हटले आहे.

या अणुकरारासाठी आपण तयार असल्याचे संकेत इराण देत आहे. अमेरिका व युरोपिय देशांची मागणी मान्य करून आपल्या कैदेत असलेल्या पाश्‍चिमात्य नागरिकांची सुटका करण्याची घोषणा इराणने केली आहे. तर इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहिया सध्या म्युनिक सुरक्षा बैठकीत सहभागी झाले असून त्यांनी अणुकरारासंबंधी काही महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्याचा दावा केला जातो.

अमेरिका व इराणकडून अणुकराराबाबत घोषणा केल्या जात असताना, या अणुकराराला कडाडून विरोध करणार्‍या इस्रायल आणि अरब मित्रदेशांकडून प्रतिक्रिया अपेक्षित होती. रविवारी जेरूसलेममध्ये पार पडलेल्या साप्ताहिक कॅबिनेट बैठकीमध्ये या संभाव्य अणुकरारावर चर्चा झाली. पाश्‍चिमात्य देश आणि इराण यांनी मान्य केलेला हा अणुकरार लहान आणि कमकुवत असल्याचे बेनेट या बैठकीत म्हणाले.

मजबूतइस्रायलच्या पंतप्रधानांनी होऊ घातलेल्या या अणुकराराची तुलना २०१५ सालच्या मूळ अणुकराराशी केली. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा अणुकरार कमकुवत होता, असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. ‘मूळ अणुकरारामुळे दोन गोष्टी घडल्या. या करारामुळे इराणने आपल्या अणुकार्यक्रमातील संवर्धनाच्या सामर्थ्यात मोठी वाढ केली आणि इराणला आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी पुरेसा अवधीही मिळाला’, अशी खोचक टिप्पणी पंतप्रधान बेनेट यांनी केली. या मूळ अणुकराराच्या तुलनेत बायडेन प्रशासन इराणबरोबर करीत असलेला करार त्याहूनही अधिक कमकुवत असल्याचा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.

‘येत्या काही दिवसात हा अणुकरार संपन्न होईल आणि त्यानंतरच्या घडामोडींसाठी, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल सर्वतोपरी तयारी करीत आहे. कारण या कराराच्या मोबदल्यात इराणला अब्जावधी डॉलर्सचा निधी मिळेल, निर्बंध मागे घेतले जातील व इराण हा सारा पैसा आखातातील दहशतवाद्यांवर खर्च करील. हा दहशतवाद इस्रायल तसेच या क्षेत्रातील देशांसाठी धोकादायक ठरेल. इतकेच नाही तर आखाती क्षेत्रात तैनात अमेरिकी जवानांसाठी देखील हा दहशतवादी धोकाच ठरणार आहे’, असा गंभीर इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला.

थेट उल्लेख केला नसला तरी, इस्रायलचे पंतप्रधान बेनेट गाझापट्टीतील हमास, लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी बंडखोर तसेच इराक-सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या धोक्याकडे लक्ष वेधत आहेत.

leave a reply