नेपाळच्या भारतविरोधाला चीनची फूस – भारतीय लष्करप्रमुख

नवी दिल्ली – नेपाळ नक्की कशासाठी विरोध करीत आहे याबद्दल कळण्यास मार्ग नाही, कदाचित ते दुसऱ्यांच्या सांगण्यावरून प्रश्न उपस्थित करीत असावेत, अशा शब्दात भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नेपाळच्या कारवायांमागे चीनची फूस असावी, असे संकेत दिले आहेत. गेल्या आठवड्यात भारताने चीनच्या सीमेजवळ असणाऱ्या नव्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. त्यावर नाराजी व्यक्त करून नेपाळने भारतीय राजदूतांना समन्स धाडले होते.

नवी दिल्लीत एका अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी नेपाळच्या कारवायांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे. याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे’, असे सांगून भारताच्या लष्करप्रमुखांनी भारत व नेपाळमध्ये मुळातच वाद नसल्याचे स्पष्ट केले.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ८ मे रोजी उत्तराखंड राज्यातून हिमालयातील ‘लिपुलेख पास’ला जाणाऱ्या ८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नेपाळने, ही भारताची एकतर्फी कारवाई असून दोन देशांमधील सामंजस्याचे उल्लंघन ठरते, अशी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नेपाळमधील भारताच्या राजदूतांना समन्स बजावून निषेधही नोंदविला होता. त्याचबरोबर नेपाळ लवकरच नवा नकाशा प्रसिद्ध करणार असून त्यात लिपुलेखसह कालापानी व लिंपियधुरा हे भाग नेपाळचाच हिस्सा म्हणून दाखविले जातील, असा इशाराही नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

नेपाळने भारताविरोधात दाखवलेली ही अनावश्यक आक्रमकता म्हणजे चीनची खेळी असू शकते, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या वक्तव्यातून सूचित होत आहे. आपल्या वक्तव्यातून त्यांनी थेट चीनचा उल्लेख केला नसला, तरी गेल्या काही वर्षांत चीनने नेपाळमध्ये वाढविलेला प्रभाव पाहता लष्करप्रमुखांचा इशारा त्याच दिशेने होता, हे सहजगत्या लक्षात येते.

भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानांना गेल्या काही आठवड्यात लडाख तसेच सिक्कीममध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या चकमकींचा संदर्भ आहे. चीनने भारताला उकसविण्यासाठी सीमांमधून घुसखोरीचे प्रयत्न केले होते. मात्र भारतीय लष्कराने आक्रमकता दाखवून चीनचे इरादे उधळले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेला चीन नेपाळ तसेच पाकिस्तानचा वापर करून भारतावर दडपण टाकण्याचे डावपेच वापरताना दिसत आहे.

भारताविरोधात नाराजीचा सूर लावणाऱ्या नेपाळने चीनने ‘माऊंट एव्हरेस्ट’वर केलेल्या दाव्यानंतर अपेक्षित आक्रमकता प्रदर्शित केली नव्हती. ही बाब नेपाळमधील चीनचा प्रभाव अधोरेखित करणारी ठरते. भारताला याची पूर्ण जाणीव असून लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे वक्तव्य त्याचीच साक्ष देत आहे.

leave a reply