चीन अमेरिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात बलाढ्य शत्रू आहे

- अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हॅले

वॉशिंग्टन – ‘चीन हा अमेरिकेचा आत्तापर्यंत सर्वात बलाढ्य आणि करडी शिस्त असलेला शत्रू आहे, हे ओळखण्यात चूक होता कामा नये. अमेरिकावरील हल्ल्यांसाठी आपण वेळीच चीनला जबाबदार धरले पाहिजे. कोविडच्या हल्ल्यापासून याची सुरुवात करायला हवी’, असा इशारा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हॅले यांनी केला. त्याचबरोबर कोरोना, स्पाय बलूनप्रकरणी चीनबाबत डोळेझाक करणाऱ्या बायडेन प्रशासनावरही हॅले यांनी टीका केली. यामुळे 2024 सालच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘चीन’ हा महत्त्वाचा मुद्दा असेल, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

चीन अमेरिकेत घुसून अमेरिकेच्या विरोधात मोर्चेबांधणी करीत असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनविरोधात काहीच करीत नसल्याची घणाघाती टीका हॅले यांनी केली. ‘चीनच्या कंपन्यांनी अमेरिकेचा 3 लाख 80 हजार एकरहून अधिक भूभाग ताब्यात घेतला आहे. यातील काही जमीन तर अमेरिकन लष्करी तळाच्या जवळ आहे. याविरोधात आपण काय करत आहोत? आपल्याच देशाचा भूभाग शत्रूला विकत द्यायला नको होता’, अशा परखड शब्दात हॅले यांनी बायडेन प्रशासनाचे कान पिळले. ‘बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेचे युग संपले आहे, असा चीनचा समज झाला आहे. पण अमेरिकेचे नाही तर अमेरिकेतील काही नेत्यांचे युग संपले आहे’, असा शब्दात हॅले यांनी बायडेन यांच्यावर टीका केली.

शत्रूत्याचबरोबर चीन अमेरिकेवर स्पाय बलूनने हेरगिरी करू शकेल, याचा कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता. पण बायडेन प्रशासनामुळे अमेरिकेला ही मानहानी देखील सहन करावी लागली, अशी जळजळीत टीका हॅले यांनी केली. तर अमेरिकेतील शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांनी चीन किंवा अमेरिका, कुणा एकाकडूनच निधी घ्यावा, असे सांगून अमेरिकेतील चीनच्या प्रभावाखालील शिक्षणसंस्थांना हॅले यांनी इशारा दिला. कोरोनाच्या मुद्यावरुनही हॅले यांनी चीनला लक्ष्य केले. त्याचबरोबर पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘चीनपासून अमेरिकेला असलेला धोका’ हा आपल्या प्रचाराचा मुद्दा असेल, याचे संकेत हॅले यांनी दिले आहेत.

चीनला अमेरिकेच्या विरोधात मिळत असलेल्या यशासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे कुचकामी चीनविरोधी धोरण जबाबदार असल्याची टीका हॅले यांनी केली. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि सत्ताधारी डेमोक्रॅट पक्ष अधिकाधिक समाजवादी बनू लागला आहे. यामुळे अमेरिकेची समाजवादाकडे अधोगती सुरू झाली आहे व ही थांबविण्यासाठीच आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याचा दावा हॅले यांनी केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांचा डेमोक्रॅट पक्षामुळे आपल्या देशावर दडपशाही, गरिबी आणि अराजकता वाढत चालल्याचा आरोप हॅले यांनी केला.

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकन करदात्यांचा पैसा वाया घालवल्याचा ठपका हॅले यांनी ठेवला. ‘बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेवरील कर्ज 31 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच पुढील दहा वर्षात अमेरिकेवर अतिरिक्त 20 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज वाढेल’, असा दावा हॅले यांनी केला.

leave a reply