चीन-जपानमधील संबंध गंभीर वळणावर आहेत

- चीनच्या राजदूतांचा जपानला इशारा

टोकिओ – १९७२ साली चीनबरोबर संबंध प्रस्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच जपान अतिशय जटील परिस्थितीला सामोरे जात आहे. अमेरिकाधार्जिण्या धोरणामुळे चीन-जपानमधील संबंध अतिशय गंभीर वळणावर पोहोचले आहेत. जपानने वेळीच अमेरिकेपासून फारकत घ्यावी, असा इशारा जपानमधील चीनचे नवे राजदूत वु जियांघाओ यांनी दिला. त्याचबरोबर चीनशी चांगले संबंध हवे असतील तर जपानने अण्वस्त्रांच्या पहिल्या वापराबाबत अमेरिकेच्या धोरणाचा कडाडून विरोध करावा, अशी मागणी चीनच्या राजदूतांनी केली.

चीन-जपानमधील संबंध गंभीर वळणावर आहेत - चीनच्या राजदूतांचा जपानला इशारामहिन्याभरापूर्वी जपानमध्ये दाखल झालेले चीनचे राजदूत वु जियांघाओ यांनी दोन दिवसांपूर्वी जपानी माध्यमांशी चर्चा केली. यानिमित्ताने चीनच्या राजदूतांनी जपानच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. जपानने चीनबाबतच्या आपल्या धोरणात बदल करावे आणि मूळ धोरणाचा अवलंब करावा. तसेच धोरणात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करुन अमेरिकेच्या सावलीतून बाहेर पडावे, असा सल्ला जियांघाओ यांनी दिला.

चीनला रोखण्यासाठी अमेरिका शेजारी देशांचा वापर करीत आहे. जपानने अमेरिकेच्या या जाळ्यात अडकू नये, असा सल्ला चीनच्या राजदूतांनी दिला. त्याचबरोबर चीन हा जपानचा सर्वात मोठा शत्रू देश असल्याचा पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या घोषणेवरही चीनच्या राजदूतांनी आक्षेप घेतला. चीनला समोर ठेवूनच आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणाऱ्या जपानने याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी जियांघाओ यांनी केली.

चीन-जपानमधील संबंध गंभीर वळणावर आहेत - चीनच्या राजदूतांचा जपानला इशारातर तैवानच्या बाबत जपानने स्वीकारलेल्या भूमिकेवरही चीनच्या राजदूतांनी आक्षेप नोंदविला. तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग आहे. त्यामुळे तैवानचा ताबा घेताना चीन बळाचा वापर केल्याखेरीज राहणार नाही. तैवानमधील स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विघटनवादी गटांविरोधात आणि या क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी ही लष्करी कारवाई आवश्यक ठरते, असे जियांघाओ म्हणाले. चीनपेक्षा तैवानच यथास्थिती बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप चीनच्या राजदूतांनी केला. अशा परिस्थितीत, तैवानची सुरक्षा हीच जपानची सुरक्षा असल्याची भूमिका जपानसाठी हानीकारक ठरेल, असा इशारा जियांघाओ यांनी दिला.

दरम्यान, गेले महिनाभर जपानमध्ये असणाऱ्या चीनच्या राजदूतांनी हा इशारा देण्यासाठी योग्य वेळ निवडली आहे. जपानचे पंतप्रधान किशिदा हे आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अशावेळी चीनने जपानला इशारा दिल्याचे जपानमधील माध्यमांचे म्हणणे आहे.

हिंदी English

 

leave a reply