अमेरिकेच्या हवाई बेटावर ‘बलून’चा संशयास्पद वावर

- अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचा दावा

वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागरातील हवाई बेटावरुन संशयास्पद ‘बलून’ वावरत असल्याचे आढळले आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने ही माहिती दिली. तीन महिन्यापूर्वी देखील अमेरिकेमध्ये अशाच स्वरूपाचा ‘बलून’ दिसत होता. हा चीनने धाडलेला स्पाय बलून असल्याचे सांगून अमेरिकेच्या हवाई दलाने हा बलून पाडला होता. पण यावेळी हवाई बेटावर वावरत असलेला बलून हेरगिरी करीत नसल्याचा दावा पेंटॅगॉन करीत आहे. तरीही अमेरिकेचे ‘एफ-२२’ रॅप्टर लढाऊ विमान त्यावर नजर ठेवून असल्याची माहिती पेंटॅगानने दिली.

अमेरिकेच्या हवाई बेटावर ‘बलून’चा संशयास्पद वावर - अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचा दावापॅसिफिक महासागरातील हवाई बेट हा अमेरिकेचा भूभाग आहे. या ठिकाणी अमेरिकन हवाईदलाचे मोठे तळ असून येथे बॉम्बर व स्टेल्थ विमानांची तैनाती करण्यात आली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी हवाई बेटांवरील ही तैनाती महत्त्वाची मानली जाते. चीनने नेहमीच हवाई बेटांवरील तैनाती व लष्करी हालचाली आपल्याविरोधात असल्याचा आरोप केला आहे.

अशा परिस्थितीत या हवाई बेटावरुन संशयास्पद बलूनने वावर केल्यामुळे माध्यमांचे लक्ष खेचून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी या बलूनने हवाई बेटावरुन वावर केल्याचे पेंटॅगॉनने सांगितले. तर सध्या हा बलून मेक्सिकोच्या दिशेने प्रवास करीत आहे. या बलूनमधून कुठल्याही प्रकारचे कम्युनिकेशन सिग्नल्स प्रसारीत झालेले नाही. त्यामुळे या बलूनचा वापर हेरगिरीसाठी होत नसल्याचा दावा पेंटॅगॉनने केला.

पण अमेरिकेने पुन्हा एकदा या बलूनचे प्रकरण उशीरा माध्यमांसमोर उघड केल्यामुळे टीका होत आहे. फेब्रुवारी महिन्यातही बायडेन प्रशासनाने चीनच्या स्पाय बलूनप्रकरणी आठवडाभरानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्या स्पाय बलूनने अमेरिकेच्या अलास्कापासून साऊथ कॅरोलिनापर्यंत प्रवास केल्यानंतर बायडेन प्रशासनाने यावर कारवाई केली होती.

या प्रवासात चीनच्या स्पाय बलूनने अमेरिकेच्या मोंटाना प्रांतातील अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांच्या सायलोज्‌‍वरुनही गस्त घातली होती. चीनने अमेरिकेच्या सामरिक ठिकाणांची माहिती काढण्यासाठी हे स्पाय बलून रवाना केले असावे, अशी चर्चा सुरू झाली होती. याप्रकरणी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहावर नियंत्रण असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने टीका केली होती. तर अमेरिकन जनता, माध्यमांमधूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

बायडेन प्रशासनाने एफ-२२ रॅप्टर विमान रवाना करुन चीनचा स्पाय बलून पाडला होता. पण विलंबाने ही कारवाई केल्यामुळे विरोधी पक्षनेते व जनतेने बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. हवाई बेटावरुन प्रवास करणाऱ्या बलूनच्या बाबतही बायडेन प्रशासन तशाच भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply