चीनच्या सागरी कारवाया समस्या वाढविणार्‍या

- अमेरिका, युरोपिय महासंघाची टीका

वॉशिंग्टन – चीन तैवानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत असताना, अमेरिका व युरोपिय महासंघाने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. ‘ईस्ट आणि साऊथ चायना सी’ क्षेत्रातील चीनच्या एकतर्फी कारवाया समस्या वाढविणार्‍या आहेत’, असे या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

युरोपिय महासंघाच्या ‘एक्स्टर्नल ऍक्शन सर्व्हिस’ या गटाचे संचालक स्टेफॅनो सॅनिओ यांनी नुकतीच अमेरिका भेट देऊन उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांच्याशी चर्चा केली. झिजियांग प्रांतातील उघूर आणि बळावलेल्या तिबेटमधील तिबेटींवर चीन करीत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा या चर्चेत होता. त्याचबरोबर चीनच्या कारवाया हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेवर गदा आणणार्‍या असल्याचा आरोप या संयुक्त निवेदनात करण्यात आला.

ईस्ट व साऊथ चायना सी तसेच तैवानच्या आखातातील चीनच्या एकतर्फी कारवाया या क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षा बाधित करणार्‍या आहेत. याचा थेट परिणाम अमेरिका व युरोपिय महासंघाच्या सुरक्षा व समृद्धीशी जोडलेला असल्याचे शर्मन आणि स्टेफॅनो यांनी स्पष्ट केले. अमेरिका व युरोपिय महासंघाच्या या संयुक्त निवेदनातील भाषा अत्यंत सौम्य असून त्याचा चीनच्या हालचालींवर काडीचाही परिणाम होण्याची शक्यता नाही. राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या विरोधात कठोर कारवाई करणार नाही, याची खात्री पटल्यामुळेच चीन तैवानच्या विरोधात आक्रमक हालचाली करीत असल्याचा ठपका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला होता.

पुढच्या वर्षी विंटर ऑलिंपिकनंतर, चीन तैवानवर हल्ला चढविणार असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे बायडेन प्रशासन चीनला इशारे देण्याच्या पलिकडे विशेष काही करीत नसल्याचा ठपका ठेवला जातो. जपानसारखा देश देखील तैवानवरील चीनच्या संभाव्य हल्ल्याविरोधात कणखर भूमिका स्वीकारीत असताना, बायडेन प्रशासनाची या आघाडीवरील मवाळ भूमिका अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरू शकते.

leave a reply