पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसाद

कोलंबो/इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सियालकोट शहरात कट्टरपंथियांनी दिवसाढवळ्या आपल्या नागरिकाची निघृणरित्या हत्या घडविल्यानंतर श्रीलंकेने संताप व्यक्त केला. पाकिस्तानच्या सरकारने या हत्येमागे असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी केली. पाकिस्तानने देखील श्रीलंकन सरकारला याबाबत आश्‍वासन दिले आहे खरे. पण गेल्या महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंसाचार माजविणार्‍या कट्टरपंथियांसमोर गुडघे टेकले होते व तेच आज सार्‍या जगासमोर पाकिस्तानला बेईज्जत करीत आहेत, अशी घणाघाती टीका पाकिस्तानात होत आहे.

पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसादपाकिस्तानातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सियालकोटमधील प्रसिद्ध गारमेंट कंपनीच्या मॅनेजरपदावरील प्रियांथा कुमार याची शुक्रवारी भर रस्त्यात कट्टरपंथियांच्या जमावाने हत्या केली. श्रीलंकन नागरिकाच्या या हत्येचा व्हिडिओ काढून कट्टरपंथियांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले, तर काही विकृत पाकिस्तानींनी श्रीलंकन नागरिकाला जिवंत जाळणार्‍या नराधमाची पाठ थोपटली तर काहींनी या दुर्दैवी घटनेवेळी सेल्फी काढल्याचे समोर येत आहे.

आपल्या देशात घडलेल्या या घटनेवर पाकिस्तानातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निर्दयी हत्येसाठी जबाबदार असलेल्या ‘तेहरिक-ए-लबैक’ या कट्टरपंथी गटाचा प्रमुख साद रिझवी आणि त्याच्या शेकडो समर्थकांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्याच महिन्यात सुटका केली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पोलीस जवानांच्या हत्येचा आरोप असणार्‍या आणि पाकिस्तानच्या व्यवस्थेला आव्हान देणार्‍या लबैकच्या नेत्यांना सोडून पंतप्रधान इम्रान खान यांनी या कट्टरपंथी संघटनेसमोर गुडघे टेकल्याची टीका झाली होती.

शुक्रवारच्या घटनेनंतर पाकिस्तानातील जनता, नेते व माध्यमे गंभीर इशारे देऊ लागले आहेत. पाकिस्तानच्याच यंत्रणेने पोसलेले हे विषारी साप येत्या काळात पाकिस्तानलाच दंश करतील, अशी चिंता पाकिस्तानात व्यक्त होत आहे. तर श्रीलंकन नागरिकाची हत्या ही काही अपवादात्मक घटना नव्हती, याकडे काहीजण लक्ष वेधत आहेत.

याआधी २०११ साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गर्व्हनर सलमान तासिर यांनी आपल्या देशातील ईशनिंदा विरोधी कायद्यांवर टीका केली होती. त्यानंतर तासिर यांच्या अंगरक्षकानेच त्यांची २७ वेळा गोळ्या घालून हत्या केली होती. तासिर यांच्या अंगरक्षकाने केलेल्या या कृत्याचे पाकिस्तानातील सुमारे ५०० कट्टरपंथिय प्रचारकांनी समर्थन केले होते. तसेच अंगरक्षकाच्या सुटकेसाठी हिंसक आंदोलनही छेडले होते. त्यावेळी पाकिस्तानचे सरकार व यंत्रणांनी याविरोधात कठोर भूमिका घेण्याचे टाळून कट्टरपंथियांसमोर नमते घेतले होते. पंतप्रधान इम्रान खान देखील नेमके हेच करीत असल्याची टीका पाकिस्तानातील विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, श्रीलंकन नागरिकाच्या हत्येचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरात उमटले असून मानवाधिकार संघटनेने पाकिस्तानच्या सरकारला धारेवर धरले आहे. तर या घटनेमागे लबैकचे कट्टरपंथी असल्याचे उघड झाल्यामुळे येत्या काळात युरोपिय महासंघ देखील पाकिस्तानवर कारवाई करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply