रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून मध्य आशियाई देशांमधील प्रभाव वाढविण्याच्या हालचाली

- सेंट्रल एशिया समिटचे आयोजन

बीजिंग – युक्रेनमधील युद्धात रशिया व्यस्त असतानाच चीनने रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्य अधिक भक्कम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चीनमध्ये पाच मध्य आशियाई देशांची दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात द्विपक्षीय भेटींबरोबरच सामूहिक बैठकींचाही समावेश आहे. चीनकडून हे प्रयत्न सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी फोनवरून बोलणी केल्याचे वृत्त रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून मध्य आशियाई देशांमधील प्रभाव वाढविण्याच्या हालचाली - सेंट्रल एशिया समिटचे आयोजनएकेकाळी रशियन संघराज्याचा (सोव्हिएत युनियन) भाग असलेल्या मध्य आशियाई देशांमध्ये रशियाने अजूनही आपला प्रभाव कायम ठेवला आहे. या देशांमध्ये कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान व ताजिकिस्तान यांचा समावेश आहे. यातील बहुतांश देश इंधन व खनिजसंपन्न देश म्हणून ओळखण्यात येतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या देशांमधील रशियन हितसंबंध कायम राखण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्याबरोबरच व्यापक अर्थसहाय्याचा मार्ग अवलंबिला होता.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा या देशांवर असलेला पगडा कमी होत असल्याचे संकेत मिळत असून त्यासाठी गेल्या दशकभरात चीनकडून सुरू असलेल्या हालचाली कारणीभूत ठरल्या आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’मध्ये मध्य आशियाई देशांवर विशेष भर दिला होता. या देशांकडे असलेले इंधन व खनिज स्रोत यांच्यावर चीनने आपली नजर वळविली असून या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस आयोजित केलेली ‘सेंट्रल एशिया समिट’ ही गुंतवणूक व त्याबरोबरच प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे. यापूर्वी चीनने या क्षेत्रात केलेल्या हस्तक्षेपावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. रशियाने चीनला तसेच चीनला जवळ करणाऱ्या मध्य आशियाई देशांना योग्य समजही दिली होती. मात्र त्यानंतरही चीनने आपले धोरण बदलले नसून उलट युक्रेनमधील संघर्षाचा लाभ उचलण्यासाठी अधिकच आक्रमक हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हिंदी English

 

leave a reply