चीनकडून जगातील लिथियमच्या साठ्यांवर ताबा मिळविण्याच्या हालचाली

अर्जेंटिनात दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

world's lithium reservesबीजिंग – इलेक्ट्रिक वाहनांसाठीचा निर्णायक घटक असणाऱ्या बॅटरीसाठी वापरण्यात येणाऱ्या लिथियमच्या साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनने लॅटिन अमेरिकेतील ‘लिथियम ट्रँगल’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या देशांपैकी अर्जेंटिनामध्ये तब्बल दोन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक लिथियम निर्मितीच्या प्रकल्पांमध्ये असल्याचे उघड झाले आहे.

Lithium Triangleहवामानबदल व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. येत्या दशकभरात जगभरात विकण्यात येणाऱ्या एकूण गाड्यांपैकी इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या 10 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज आहे. या गाड्यांसाठी ‘लिथियम आयन बॅटरी’ज्‌‍ वापरण्यात येतात. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड प्रमाणात लिथियमची गरज भासणार आहे.

सध्या जगात लिथियमचे सर्वाधिक साठे असणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, चिली, चीन, अर्जेंटिना व डीआर काँगो या देशांचा समावेश होतो. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लिथियमचे साठे असतानाही चीन आता दुसऱ्या देशांमधील साठ्यांवर ताबा मिळवून या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अर्जेंटिनाच्या लिथियम साठ्यांमधील अब्जावधी डॉलर्सची गुंतवणुक त्याचेच संकेत देणारी ठरते.

चीन अर्जेंटिनाच्या साल्टा प्रांतातील दोन प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करीत असून त्यातून 2024 सालापर्यंत दीड लाख टन लिथियम कार्बोनेटचे उत्पादन होऊ शकते. अर्जेंटिनाबरोबरच ‘लिथियम ट्रँगल’चा भाग असणाऱ्या बोलिव्हिया तसेच चिलीमध्येही चीनकडून गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. या तीन देशांमध्ये जगातील एकूण लिथियम साठ्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक लिथियम आढळत असल्याने चीनच्या या हालचाली चिंता वाढविणाऱ्या ठरल्या आहेत.

leave a reply