अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांच्या आर्थिक धोरणांविरोधात असंतोष वाढला

Inflation वॉशिंग्टन – आपल्या कारकिर्दीत अमेरिकेत एक कोटींहून अधिक रोजगारांची निर्मिती झाली, असा दावा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकताच केला होता. मात्र बायडेन यांच्या या वक्तव्यावर अमेरिकी मतदारांमध्ये नाराजीच असल्याचे समोर येत आहे. नोकऱ्या निर्माण होत असल्या तरी त्यातून मिळणारे वेतन महागाईच्या भडक्यात अपुरे पडत असल्याची चिंता अमेरिकी नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी शेअरबाजारांमध्ये होणारी घसरण व मंदीचे सावट यामुळेही अमेरिकी जनतेत असंतोष असून बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाला मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत त्याचा फटका बसलेला दिसेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, बायडेन नोकऱ्या वाढल्याचे दावे करीत असतानाच अमेरिकेच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या कपातीची घोषणा केली.

biden-democracyराष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 2021 साली सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेतील महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या अमेरिकेतील महागाईचा दर आठ टक्क्यांहून अधिक असून हा गेल्या चार दशकांमधील उच्चांक ठरतो. ही महागाई रोखण्यासाठी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरातही मोठी वाढ केली आहे. त्यापाठोपाठ बायडेन प्रशासनानेही अब्जावधी डॉलर्सच्या योजना जाहीर करून महागाई कमी होईल, असे दावे केले आहेत. पण त्यानंतरही महागाई रोखण्यात बायडेन प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

या अपयशामुळे मोठा फटका बसेल, हे ध्यानात घेऊन बायडेन यांनी आपल्या कारकिर्दीत नोकऱ्यांची संख्या वाढल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी यंत्रणेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात देशात दोन लाख 61 हजार नोकऱ्यांची भर पडली. याचा आधार घेत बायडेन यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एक कोटींहून अधिक नोकऱ्यांची भर पडल्याचा दावा केला. यापूर्वी कोणालाही ही कामगिरी करता आली नसल्याचेही बायडेन यांनी सांगितले. मात्र अमेरिकी नागरिकांनी राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्याला फारसे महत्त्व दिलेले नाही.

manchin-faces-conservativeविविध सर्वेक्षणे, कल व अभ्यासगटांच्या अहवालातून महागाई, ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ व संभाव्य मंदीचे परिणाम हे घटक अमेरिकी जनतेसाठी सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे समोर येत आहे. नोकऱ्या निर्माण होत असल्या तरी त्यातून मिळणारे उत्पन्न महागाईच्या भडक्यात अपुरे पडत असल्याची नाराजी अमेरिकी नागरिक व्यक्त करीत आहेत. अमेरिकी नागरिकांना दररोज अधिक पैसा खर्च करावा लागत असल्याने त्यांच्यासाठी ही दैनंदिन समस्या बनली आहे, अशा शब्दात अमेरिकी विश्लेषकांनी महागाईचा मुद्दा जनतेसाठी अधिक गंभीर व जवळचा असल्याची जाणीव करून दिली.

महागाई रोखण्यासाठी तसेच अमेरिकी जनतेला दिलासा देण्यासाठी बायडेन यांनी घेतलेले निर्णयही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हानीकारक ठरत असल्याचे समोर येत आहे. डेमोक्रॅट पक्षातील संसद सदस्यच बायडेन यांच्या यासंदर्भातील धोरणांवर टीका करीत आहेत. बायडेन यांनी सोशल सिक्युरिटी, मेडिकेअर व ‘स्टुडंट लोन रिलिफ’ यासारख्या योजनांसाठी केलेली तरतूद अमेरिकी अर्थव्यवस्थेतील तूट प्रचंड प्रमाणात वाढवित असल्याचा ठपका सिनेटर जो मन्चिन यांनी ठेवला. तर बायडेन यांनी घेतलेल्या विविध निर्णयामुळे गेल्या दोन वर्षात अमेरिकी अर्थव्यवस्थेवर 309 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त बोजा पडल्याचा दावा ‘अमेरिकन ॲक्शन फोरम’ या अभ्यासगटाने केला. दरम्यान, बायडेन यांनी नोकऱ्यांच्या वाढीबाबत केलेला दावाही फोल ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही दिवसात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा तसेच नवी भरती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात ॲमेझॉन, फेसबुक, ॲपल, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, लिफ्ट, स्ट्राईप यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हजारो अमेरिकी नागरिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

leave a reply