पाकिस्तानात कोसळलेल्या क्षेपणास्त्रावर भारताच्या संरक्षणमंत्र्यांचा खुलासा

नवी दिल्ली/इस्लामाबाद – तांत्रिक बिघाडमुळे भारतीय लष्कराचे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. असे असले तरी, भारताचा क्षेपणास्त्र यंत्रणा विश्‍वासार्ह व सुरक्षित आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. अमेरिकेनेही ही निव्वळ अपघातासारखी घटना असल्याचे सांगून यात दुसरे काहीही नसल्याचा निर्वाळा दिला आहे. पण पाकिस्तान मात्र याबाबत हटवादी भूमिका स्वीकारून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याची तयारी करीत आहे.

कोसळलेल्या क्षेपणास्त्रावर९ मार्च रोजी भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. आपल्या सीमेपासून १०० किलोमीटरहून अधिक अंतरावर भारताचे क्षेपणास्त्र कोसळते, तरीही पाकिस्तानच्या यंत्रणांना याची खबरबात लागत नाही, यावर पाकिस्तानात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताकडून चुकून असा प्रकार होऊच शकत नाही, असे पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्यांना वाटत आहे. इतकेच नाही तर पाकिस्तान आपले क्षेपणास्त्र पाडण्यात यशस्वी ठरतो का, याचा अंदाज भारताला घ्यायचा होता. याची चाचपणी करण्यासाठी भारताने हे क्षेपणास्त्र डागले होते, असा आरोप पाकिस्तानातून केला जात आहे.

यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत खुलासा दिला व त्यावर दिलगिरी देखील व्यक्त केली. पण यानेही पाकिस्तानचे समाधान झालेले नाही. अगदी अमेरिकेनेही हा अपघात होता, असा निर्वाळा दिला, तरीही पाकिस्तान त्यावर संशय व्यक्त करीत आहे. भारताच्या संरक्षणमंत्र्यांचा खुलासा पाकिस्तानने नाकारला असून ही माहिती अर्धवट असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला याबाबत पत्र लिहून पाकिस्तानने या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय समुदायाने चौकशी करावी, अशी मागणी केली.

पाकिस्तानच्या या मागणीला प्रतिसाद मिळण्याची फारशी शक्यता नाही. केवळ भारताच्या विरोधात आरडाओरडा करण्याची संधी यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना मिळालेली आहे. त्याचा ते पुरेपूर फायदा घेत असल्याचे दिसते. त्याचवेळी पाकिस्तानातील सामरिक विश्‍लेषकांनी भारत आपल्या देशावर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा दावा केला आहे. स्फोटके नसलेले क्षेपणास्त्र डागून पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची क्षमता भारताने तपासून पाहिली, असा दावा या विश्‍लेषकांनी केला आहे. रशियाने हल्ला चढवून जशी युक्रेनची वाताहत केली, त्याच धर्तीव भारतही पाकिस्तानचा निकाल लावेल, अशी चिंता या देशातील काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. तर काही पाकिस्तानी पत्रकार हा भारताने पाकिस्तानला दिलेला सज्जड इशारा असल्याचे दावे करीत आहेत.

leave a reply