चीनकडून इस्रायल-पॅलेस्टाईनला मध्यस्थीचा प्रस्ताव

- चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायल-पॅलेस्टाईनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

बीजिंग – सौदी अरेबिया आणि इराणमध्ये मध्यस्थी करून त्यांच्या चर्चा घडवून आणणाऱ्या चीनने आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चेसाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांनी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन आणि पॅलेस्टाईनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांच्याशी चर्चा करुन हा मध्यस्थीचा प्रस्ताव दिला. पण इस्रायल व पॅलेस्टाईनचे नेते शांतीचर्चेसाठी तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. पण आखातातील प्रभाव वाढविण्यासाठी चीन वेगाने पावले टाकत असल्याचे यामुळे समोर आले आहे.

चीनकडून इस्रायल-पॅलेस्टाईनला मध्यस्थीचा प्रस्ताव - चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायल-पॅलेस्टाईनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चादोन दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांनी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन आणि पॅलेस्टाईनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांच्याशी फोनवरुन स्वतंत्र चर्चा केली. गेल्या महिन्यात चीनने सौदी अरेबिया व इराणमध्ये घडविलेल्या यशस्वी मध्यस्थीचा दाखला देऊन गँग यांनी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे शांतीचर्चेचा प्रस्ताव दिला. ‘परस्परांमधील वाद बाजूला ठेवून चर्चेने मतभेद सोडविण्याबाबत सौदी-इराणने चांगले उदाहरण समोर ठेवले आहे. इस्रायलने राजकीय धैर्य दाखवावे आणि पॅलेस्टाईनबरोबर शांतीचर्चा सुरू करावी. मध्यस्थी घडविण्यासाठी चीन तयार आहे’, असे परराष्ट्रमंत्री गँग यांनी म्हटले होते.

तर पॅलेस्टाईनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हाच प्रस्ताव दिला. इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये मध्यस्थी घडविण्यासाठी चीन सक्रीय भूमिका पार पाडेल, असा दावा गँग यांनी केला. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या नेत्यांबरोबर झालेल्या या चर्चेचे अर्धवट तपशील चीनने दोन दिवसानंतर जाहीर केले. पॅलेस्टाईनने चीनच्या या प्रस्तावाबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या दिलेल्या शांतीचर्चेच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

टेम्पल माऊंट परिसरात शांतता राखण्याबाबत परराष्ट्रमंत्री कोहेन आणि परराष्ट्रमंत्री गँग यांच्यात चर्चा पार पडल्याचे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी चीनने इस्रायलला सहाय्य करावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी केल्याची माहिती इस्रायलने दिली. मात्र पॅलेस्टाईनच्या मुद्याबाबत एका शब्दानेही प्रतिक्रिया देण्याचे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने टाळले. त्यामुळे चीन दावा करीत असला तरी इस्रायल या शांतीचर्चेसाठी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, अमेरिकेचा प्रभाव मोडून चीन आखातातील आपला प्रभाव वाढवित असल्याचा दावा केला जातो. पण तैवानबाबत ‘वन चायना’ धोरण अंतिम असल्याचे सांगणारा चीन इस्रायल-पॅलेस्टाईनबाबत ‘टू स्टेट पॉलिसी’चे दुटप्पी धोरण स्वीकारीत असल्याची टीका इस्रायली माध्यमे करीत आहेत.

हिंदी

 

leave a reply