प्रिन्स रेझा पेहलवी यांचा दौरा घडवून इस्रायलचा इराणला धक्का

जेरूसलेम – इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक सहकार्य सुरू झाले, हा इस्रायलला बसलेला फार मोठा धक्का असल्याचे दावे केले जातात. विशेषतः इस्रायलने अरब-आखाती देशांबरोबर केलेला अब्राहम करार यामुळे धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आखाती क्षेत्रात अशा उलथापालथी सुरू असताना, इराणवर एकेकाळी सत्ता गाजवणाऱ्या पेहलवी घराण्याचे प्रिन्स रेझा पेहलवी इस्रायलच्या भेटीवर आले आहेत. सौदीबरोबरील सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतर आखाती क्षेत्रातील देशांची इस्रायलविरोधात एकजूट करण्याचा निर्धार करणाऱ्या इराणसाठी, प्रिन्स रेझा पेहलवी यांची इस्रायल भेट फार मोठी चिथावणी देणारी बाब ठरते.

प्रिन्स रेझा पेहलवी यांचा दौरा घडवून इस्रायलचा इराणला धक्का१९७९ सालच्या इराणमधील इस्लामी क्रांतीआधी या देशावर ‘मोहम्मद रेझा शहा पेहलवी’ यांची राजवट होती. मोहम्मद रेझा यांची सत्ता असेपर्यंत इराणचे अमेरिका, युरोप तसेच इस्रायलबरोबरही सहकार्यपूर्ण संबंध होते. अमेरिकेने इराणला लष्करी सहाय्य देखील पुरविले होते. पण १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर मोहम्मद रेझा शहा यांना आपल्या कुटुंबियांसोबत देश सोडून अमेरिकेत पलायन करावे लागले होते. त्यानंतर इराण व पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव निर्माण झाला.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ इराणमध्ये इस्लामी राजवट आहे. तरी देखील इराणच्या जनतेत मोहम्मद रेझा शहा पेहलवी व त्यांचे उत्तराधिकारी प्रिन्स रेझा पेहलवी यांच्याबाबत आदर आहे. काही वर्षांपूर्वी इराणच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने दबक्या आवाजात पेहलवी यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित व्हावी, अशी मागणी केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. प्रिन्स रेझा पेहलवी यांचा दौरा घडवून इस्रायलचा इराणला धक्कागेल्या वर्षी इराणमध्ये राजवटीच्या विरोधात भडकलेल्या निदर्शनांमध्ये आपल्या देशात लोकशाही सरकार असावे तसेच प्रिन्स रेझा पेहलवी यांना सत्तेवर आणण्याच्या घोषणा दिल्या जात होता.

इस्रायल व अरब देशांमध्ये पार पडलेल्या अब्राहम कराराचे प्रिन्स रेझा पेहलवी यांनी स्वागत केले होते. या सहकार्यामुळे इराणमधील राजवटीला चांगले उत्तर मिळेल, असा विश्वास प्रिन्स रेझा यांनी व्यक्त केला होता. पण गेल्या महिन्यात इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक सहकार्य सुरू झाल्यानंतर अब्राहम कराराला हादरा बसल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत इराणमध्ये लोकशाही सरकारची मागणी करणाऱ्या प्रिन्स रेझा पेहलवी यांची इस्रायल भेट इराणसाठी आव्हान ठरत आहे.

प्रिन्स रेझा पेहलवी यांचा दौरा घडवून इस्रायलचा इराणला धक्काइस्रायलच्या गुप्तचर विभागाच्या मंत्री जिला गॅम्लीएल यांनी प्रिन्स रेझा यांच्या इस्रायल भेटीसाठी प्रयत्न केले. इस्रायल ‘हॉलोकॉस्ट रेमेंबरन्स डे’ साजरा करीत असताना प्रिन्स रेझा यांची ही इस्रायल भेट इराणला आव्हान देणारी बाब ठरते. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रिन्स रेझा यांनी हजेरी लावली होती. तसेच जेरूसलेममधील ‘वेस्टर्न वॉल’ला देखील प्रिन्स रेझा यांनी भेट दिली. तसेच १९७९ सालच्या आधी इस्रायल व इराणमध्ये असलेले सहकार्य नव्याने प्रस्थापित करण्याची घोषणा प्रिन्स रेझा यांनी केली.

प्रिन्स रेझा पेहलवी यांच्या इस्रायल भेटीनंतर अस्वस्थ झालेल्या इराणने नवे आरोप केले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इराणमध्ये राजवटीच्या विरोधात भडकलेल्या निदर्शनांना प्रिन्स रेझा पेहलवी यांनी चिथावणी दिली होती, असा ठपका इराणने ठेवला आहे. इराणच्या राजवटीविरोधातील हा कट फसल्यानंतर इराणविरोधात नवी योजना आखण्यासाठी प्रिन्स रेझा पेहलवी इस्रायलमध्ये गेल्याचा आरोप इराणने केला आहे.

हिंदी

 

leave a reply