अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास चीन, पाकिस्तानचा निधी बंद करणार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निकी हॅले यांचा इशारा

elected as US Presidentवॉशिंग्टन – 2024 साली अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून आल्यास अमेरिकेकडून चीन, पाकिस्तान आणि इराकला मिळणारा निधी बंद केला जाईल. अमेरिकन करदात्यांचा पैसा अमेरिकेविरोधात कारस्थाने आखणाऱ्यांच्या हाती पडू देणार नाही, अशी घोषणा राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निकी हॅले यांनी केला. कोरोनाचे उगमस्थान असणारा चीन आणि दहशतवादाचे केंद्र असणाऱ्या पाकिस्तानला हॅले यांनी सर्वाधिक लक्ष्य केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात निकी हॅले यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे राजदूत म्हणून जबाबदारी पार पाडली होती. इस्रायल आणि भारताच्या समर्थक अशी हॅले यांची ओळख होती. त्याचबरोबर चीन व पाकिस्तानच्या कडव्या विरोधक म्हणूनही हॅले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हॅले देखील सहभागी झाल्यामुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

Election_2024_Haleyअमेरिकन वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात हॅले यांनी बायडेन प्रशासनाने जाहीर केलेल्या परदेशी निधीवर जोरदार टीका केली. 2022 साली बायडेन प्रशासनाने चीन, पाकिस्तान, इराक या व इतर अमेरिकाविरोधी देशांना 46 अब्ज डॉलर्सचा निधी पुरविल्याचा आरोप हॅले यांनी केला. अमेरिकन करदात्यांचा पैसा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला देण्यात आला. त्याचबरोबर रशियाचा निकटतम मित्रदेश असलेल्या बेलारूस तसेच अमेरिकेने दहशतवादी सरकार जाहीर केलेल्या क्युबाला देखील निधी पुरविण्यात आला, याकडे हॅले यांनी लक्ष वेधले.

आपण निवडून आल्यास अमेरिकन करदात्यांचा पैसा अमेरिकेविरोधात कारस्थाने रचणाऱ्यांच्या हाती हा पैसा जाऊ देणार नाही, अशी घोषणा हॅले यांनी केली. जाहीरपणे अमेरिकेवर टीका करायची आणि खाजगीत अमेरिकेकडून पैशांची भीक मागणाऱ्या देशांना छदामही मिळू देणार नसल्याचे हॅले यांनी ठणकावले. खाजगीत भीक मागणाऱ्यांचा उल्लेख करून हॅले यांनी आमच्या देशाला हिणवल्याचा दावा पाकिस्तानचे विश्लेषक करीत आहेत.

भारतीय वंशाच्या हॅले यांनी याआधी आपला पाकिस्तानच्या अमेरिकाद्वेषी धोरणाला कडवा विरोध असल्याचे दाखवून दिले होते. आपल्या निवडणूक प्रचारातही हॅले पाकिस्तानला लक्ष्य करीत आहेत. अशा परिस्थितीत, हॅले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा किंवा उपराष्ट्राध्यक्षा बनल्या तरी पाकिस्तानवरील संकटाची तीव्रता अधिकच वाढेल, अशी चिंता पाकिस्तानी विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply