ब्रह्मपुत्रेवरील धरणाच्या उभारणीद्वारे चीनची भारताला चिथावणी

नवी दिल्ली/बीजिंग – ब्रह्मपुत्रा नदीवर उभारीत असलेल्या धरणाबाबत भारत आणि बांगलादेशला विश्‍वासात घेतले जात असल्याचा दावा चीनने केला आहे. तर हे धरण बांधत असताना, चीनने उतारावरील देशांचे हित ध्यानात घ्यावे, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. दोन्ही देश राजनैतिक भाषेत या धरणावर अत्यंत संयमाने बोलत असल्याचे समोर येत आहे. पण प्रत्यक्षात चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण उभारून भारताला अद्दल घडविण्याचीच तयारी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. याविरोधात भारतानेही हालचाली सुरू केल्या असून ब्रह्मपुत्रेवर धरण उभारून भारतही चीनला काटशह देण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

ब्रह्मपुत्रा

सुमारे 3800 किलोमीटर इतक्या लांबीची जगातील मोठी नदी असलेली ब्रह्मपुत्रा चीनमधून भारत व भारतातून बांगलादेशमध्ये जाते. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये यारलंग झांग्बो म्हटले जाते. या नदीचे पाणी रोखून भारताच्या ईशान्येकडील राज्यांची कोंडी करण्याचा चीनचा कुटील हेतू आहे. याआधीही चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविण्यासाठी हालचाली करीत असल्याची बाब समोर आली होती. मात्र लडाखमधील सीमावादात भारताच्या कणखरपणामुळे अस्वस्थ झालेला चीन ब्रह्मपुत्रेवर धरण उभारण्याच्या योजनेला चालना देत आहेत. याद्वारे भारताला अद्दल घडविता येईल, असे चीनचे आडाखे आहेत.

मात्र हे धरण बांधत असताना, चीन यापासून उतरावर असलेल्या भारत व बांगलादेशाला चिंतेचे काहीच कारण नसल्याचा निर्वाळा देत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सदर धरणाबाबत भारत तसेच बांगलादेशला चीन विश्‍वासात घेत असल्याचा दावा केला. या नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा वैध अधिकार चीनला आहे, असेही चुनयिंग पुढे म्हणाल्या. सध्या या धरणाची योजना प्राथमिक स्थितीत आहे, त्यात फार काही तपासून पाहण्यासारखे नाही. बऱ्याच काळापासून चीन या नदीबाबत भारत आणि बांगलादेशाशी सहकार्य करीत असून आवश्‍यक ती माहिती पुरवित आला आहे, असे चुनयिंग यांनी स्पष्ट केले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या सौम्य भाषेचा वापर करीत असल्या, तरी प्रत्यक्षात सदर धरणाचा प्रकल्प हाती घेणे म्हणजे चीनच्या आक्रमक भारतविरोधी रणनीतिचा भाग ठरतो. याद्वारे भारताचे पाणी रोखण्याची क्षमता चीन प्राप्त करील आणि ईशान्येकडील राज्यांना शेतीसाठी व पिण्यासाठीही पाणी मिळू देणार नाही, अशी चिंता विश्‍लेषक फार आधीपासून व्यक्त करीत आले आहेत. भारताबरोबर युद्ध पेटले तर चीन या धरणाचा वापर शस्त्रासारखा करील, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

केवळ भारतच नाही, तर बांगलादेशाच्याही चिंता चीनच्या या धरणामुळे वाढल्या आहेत. चीन व्यूहरचनात्मकदृष्ट्या या धरणाचा वापर करण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन भारतानेही त्याविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या या धरणाबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, भारतही ब्रह्मपुत्रेवर धरण बाधण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची बांगलादेश भेट रद्द झाली होती. त्यामागे चीन ब्रह्मपुत्रेवर उभारीत असलेले हे धरण असावे, अशी दाट शक्यता समोर येत आहे. बांगलादेशचा हा दौरा रद्द झाल्यामुळे चीनच्या संरक्षणमंत्र्यांना सारवासारव करण्यासाठी अचानक पाकिस्तानचा दौरा करावा लागला होता, असे दावे केले जात आहेत.

leave a reply