भारतीय नौदल चीनला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

- नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग

नवी दिल्ली – ‘कोविड-19’ आणि चीन अशा दोन्ही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे, असे नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनने आगळीक केलीच, तर त्याला उत्तर देण्याची पूर्ण तयारी नौदलाने केली आहे. चीनला प्रत्युत्तर देण्याची निश्‍चित अशी योजना नौदलाकडे तयार असल्याचे नौदलप्रमुखांनी बजावले. नौदलप्रमुखांची ही विधाने म्हणजे भारताने चीनला दिलेला आणखी एक सज्जड इशारा असल्याचे दिसत आहे.

चीनला प्रत्युत्तर

लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्रात नौदलाचे ‘मार्कोस’ पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच या पथकासाठी नौदलाच्या विशेष बोटी देखील रवाना करण्यात आल्या आहेत. यानंतर चीनने या क्षेत्रात हल्ला चढविण्याची क्षमता असलेल्या बोटींची तैनाती केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर, नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी भारतीय नौदलाच्या चीनविरोधी सज्जतेची माहिती उघड केली असून ही लक्षवेधी बाब ठरते. लष्कर तसेच वायुसेनेच्या बरोबरीने भारतीय नौदलानेही ईशान्येकडील सीमेच्या संरक्षणासाठी आपल्या ताफ्यातील ‘पी-8आय’ टेहळणी विमाने तसेच हेरॉन ड्रोन्सची तैनाती केल्याची माहिती नौदलप्रमुखांनी दिली.

यासोबत हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर नौदलाची करडी नजर रोखलेली आहे, याचीही जाणीव ॲडमिरल करमबिर सिंग यांनी करून दिली. चाचेगिरीविरोधी कारवाईसाठी 2008 सालापासून चीनच्या सुमारे तीन युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात सतत तैनात केल्या जातात. त्याचवेळी संशोधनासाठीही चीनची जहाजे हिंदी महासागर क्षेत्रात आहे. नौदल त्यावर नजर रोखून आहे. चीनकडून कुठल्याही प्रकारची आगळीक झाली, तर त्याला कशारितीने उत्तर द्यायचे याची जय्यत तयारी नौदलाने आधीपासूनच करून ठेवली असून याबाबतची मानक कार्यप्रणालीही तयार आहे, अशा सूचक शब्दात नौदलप्रमुखांनी चीनला संदेश दिला.

भारतीय नौदल आपल्या क्षमतेत सातत्याने वाढ करीत आहे. नौदलासाठी उभारल्या जाणाऱ्या 43 पैकी 41 युद्धनौका व पाणबुड्यांची देशांतर्गत उभारणी होत आहे. यामध्ये विमानवाहू युद्धनौकेचाही समावेश असल्याचे नौदलप्रमुखांनी म्हटले आहे. ड्रोन हल्ल्यांविरोधात नौदलाने ‘स्मॅश-2000’ रायफली मिळविण्याची तयारी केली असून अधिक क्षमता असलेले सुमारे 30 प्रिडेटर ड्रोन्स तिन्ही संरक्षणदलांना मिळावे, यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती नौदलप्रमुखांनी दिली.

नौदल अशारितीने आपल्या क्षमतेत वाढ करीत असताना, नौदलाकडे हवाई मारक क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने आगेकूच करीत असताना, आपल्याच किनाऱ्यांवर बंदिस्त रहायचे नसेल, तर विमानवाहू युद्धनौकेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सांगून नौदलप्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी चीनला थेट इशारा देण्याच्या एक दिवस आधी व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला यांनीही नौदलाच्या सज्जतेमुळे चीन हिंदी महासागर क्षेत्रात दुःस्साहस करण्यास धजावलेला नाही, असे म्हटले होते. आता नौदलप्रमुखांकडून चीनला देण्यात आलेला इशारा भारताची आक्रमक भूमिका स्पष्ट करीत आहे. लडाखच्या ‘एलएसी’वर चीन नवी तैनाती करीत असून हिंदी महासागर क्षेत्रातही चीनने भारताच्या विरोधात हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळू लागले होते. मात्र मलाक्काच्या आखातात भारताचे नियंत्रण असून कुठल्याही क्षणी भारत मलाक्काच्या आखातातून होणारी चीनची मालवाहतूक रोखू शकतो, याची जाणीव चीनला भारताकडून करून दिली जात आहे.

सलग दोन दिवस भारत चीनला आपल्या नौदलाच्या सज्जतेबाबत इशारा देत आहे. त्याचवेळी भारतीय नौदलाकडून युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांच्या तसेच पाणबुडीभेदी टॉर्पिडोज्‌च्याही चाचण्या केल्या आहेत. याद्वारे भारत आपली क्षमता व सामर्थ्याचे प्रदर्शन करीत आहे.

leave a reply