वुहान लॅब थिअरी’च्या नव्या तपासाची मागणी चीनने फेटाळली

चीनने फेटाळलीबीजिंग/जीनिव्हा – कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्ये झाला, या मुद्यावर पुन्हा चौकशी करण्याची मागणी चीनने फेटाळली आहे. काही देश कोरोनाच्या मुद्याचे राजकारण करीत आहेत, असा दावा करीत चीनने नव्या चौकशीस नकार दिला आहे. चीनच्या या नकारामुळे कोरोनाच्या उगमाबाबत चीन लपवाछपवी करीत असल्याचा संशय अधिकच दृढ झाल्याचे मानले जाते. गेल्या आठवड्यात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीच चीनने पुन्हा एकदा तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.

‘जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे मूळ शोधण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी दुसर्‍या टप्प्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव चीन व इतर अनेक देशांनी घेतलेल्या भूमिकेशी विसंगत आहे. काही देश कोरोनाच्या उगमाच्या मुद्याबाबत राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनला या गोष्टीची चिंता वाटते’, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी नव्या चौकशीची मागणी नाकारली आहे.

चीनने फेटाळलीडब्ल्यूएचओ’ने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. त्यावेळी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीही त्याचे समर्थन केले होते. या अहवालापूर्वीही त्यांनी सातत्याने चीनची बाजू घेतल्याचे समोर आले होते. मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी घेतलेला ‘यु टर्न’ लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत.

2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते.

चीनने फेटाळलीमात्र चीनकडून सुरू असणार्‍या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते.

चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक देशांनी ही थिअरी उचलून धरण्यास सुरुवात केली असून त्यासंदर्भातील विविध प्रकारची माहितीही समोर येऊ लागली आहे.

याच पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. चीनने अधिक पारदर्शकता व खुलेपणा पाळून साथीच्या सुरुवातीच्या काळातील ‘रॉ डेटा’ संघटनेकडे द्यावा, अशी आग्रही मागणीही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. मात्र त्याला नकार देऊन चीनने कोरोनाच्या उगमाबाबत सारे काही आलबेल नसल्याच्या संशयाला अधिकच बळ पुरविल्याचे दिसत आहे.

leave a reply