चीन, रशियाच्या बॉम्बर विमानांची एशिया-पॅसिफिक क्षेत्रात गस्त

बीजिंग/सेऊल – शुक्रवारी चीन आणि रशियाच्या चार बॉम्बर विमानांनी एशिया-पॅसिफिक हवाई क्षेत्रातून संयुक्त गस्त पूर्ण केली. यानंतर ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी मुखपत्राने भारत, जपान, ऑस्ट्रेलियाला धमकावले. ‘क्वाड’ आणि ‘ऑकस’मध्ये सहभागी झालेल्या शेजारी देशांना इशारा देण्यासाठी हा सराव आवश्यक होता, असा इशारा चिनी मुखपत्राने विश्‍लेषकांच्या हवाल्याने दिला.

चीन, रशियाच्या बॉम्बर विमानांची एशिया-पॅसिफिक क्षेत्रात गस्तचीनच्या दोन ‘एच-६के’ आणि रशियाच्या दोन ‘टीयू-९५ एमसी’ या बॉम्बर विमानांच्या जोडीने ही गस्त घातली. ‘सी ऑफ जपान’ आणि ‘ईस्ट चायना सी’ या सागरी क्षेत्रावरुन आपल्या बॉम्बर विमानांनी उड्डाण केल्याचे चीन व रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. यावेळी रशियाच्या लढाऊ विमानांनी साथ दिल्याचा दावा केला जातो. गेल्या काही आठवड्यांमध्ये उभय देशांच्या हवाईदलात पार पडलेला हा तिसरा सराव ठरतो.

अमेरिका आणि नाटोबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, चीन-रशियातील या हवाई गस्तीकडे पाहिले जाते. पाश्‍चिमात्य देशांच्या प्रक्षोभक हालचाली जागतिक स्थैर्याला हादरे देत असताना चीन व रशियाचा हा सराव महत्त्वाचा ठरतो, असे ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या मुखपत्राने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय शांतता व स्थैर्यासाठी याचे आयोजन केल्याचा दावा चिनी मुखपत्राने केला.

या संपूर्ण सरावात दोन्ही देशांच्या हवाईदलाने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केल्याचा दावा ‘शिनुआ’ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने केला. हा एक सामान्य सराव असून यावेळी कुठल्याही देशाच्या हवाईहद्दीत प्रवेश केला नसल्याचे चीनने जाहीर केले. पण चीन-रशियाच्या विमानांनी आपल्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे. इतकेच नाही तर चीन-रशियन विमानांच्या मागे आपली लढाऊ विमाने रवाना केल्याची माहिती दक्षिण कोरियाने दिली आहे.

leave a reply