चीन व पाकिस्तानच्या संरक्षणदलांवर भारतातून सायबरहल्ले

- चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चा दावा

बीजिंग/नवी दिल्ली – भारतातील हॅकर्सचा गट चीन तसेच पाकिस्तानची संरक्षणदले तसेच सरकारी यंत्रणांवर सायबरहल्ले चढवित असल्याचा दावा चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने केला. आपल्याशी निगडीत असलेल्या हॅकर्सच्या गटाचा वापर करून भारतालाच सायबर हल्ल्यांचे लक्ष्य करणार्‍या चीनकडून भारतावर केले जाणारे हे आरोप हास्यास्पद ठरतात. लडाखच्या गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चीनने भारतावरील सायबर हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढविली होती. यासंदर्भातील भारताच्या आरोपांची तीव्रता वाढण्याच्या आधीच चीन भारताविरोधात आरडाओरडा करून आपल्या बचावाची तरतूद करीत असल्याचे दिसत आहे.

चीन व पाकिस्तानच्या संरक्षणदलांवर भारतातून सायबरहल्ले - चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चा दावाचीनमधील सायबरसुरक्षा कंपनी असणार्‍या ‘अंतिय लॅब्स’ने सायबरहल्ल्यांचा अहवाल प्रसिद्ध केल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ने आपल्या लेखात म्हटले आहे. भारतातून हल्ले करणार्‍या गटाचे नाव ‘यु शिआंग’ असल्याचे सांगण्यात आले असून गेल्या चार वर्षापासून हा गट सायबरहल्ले करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हॅकर्सच्या गटाने चिनी यंत्रणांवर सायबरहल्ले सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. हा गट नेपाळी लष्कराशी संबंधित असलेल्या मेलिंग लिस्टचा वापर हा गट करीत असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

दरम्यान, सायबर हल्ले व सायबर क्षेत्रातील इतर विघातक कारवायांसाठी चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर फार आधीपासूनच बदनाम आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर युरोपिय देशांवर चीनमधून सायबर हल्ले होत असल्याची बाब वेळोवेळी उघड झाली होती. याची गंभीर दखल अमेरिकेला घ्यावी लागली आणि अमेरिकेने आपल्या विरोधातील सायबर हल्ला म्हणजे आपल्या देशावरील हल्लाच ठरतो, असे घोषित करून त्यासाठी कायदाच संमत केला होता. चीनने आपल्या प्रतिस्पर्धी देशांना लक्ष्य करण्यासाठी सायबर आर्मी अर्थात सायबर हल्लेखोरांची फौजच तयार केली आहे. पण त्याचा आपल्याशी थेट संबंध जोडला जाणार नाही, याची दक्षता चीनकडून घेतली जाते. तरीही चीनच्या या कारवाया जगापासून लपून राहिलेल्या नाहीत.

पुढच्या काळात चीन सायबर क्षेत्राचे लष्करीकरण करण्याची जोरदार तयारी करीत असल्याचे आरोप होत आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षणदलप्रमुख, लष्करप्रमुख सातत्याने सायबर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. भारताच्या सायबर सुरक्षेला चीनपासून धोका असल्याचे थेट आरोप केले जात नसले, तरी भारताचे लष्करी नेतृत्त्व या क्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीकडे सातत्याने बोट दाखवित आले आहेत.

leave a reply