पूर्व लडाखमधून चीनच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या एलएसीवरील गोग्रा पर्वतराजी व हॉटस्प्रिंगमधून चिनी लष्कराने सुरू केलेली माघारीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. भारत व चीनच्या लष्कराने इथे एकमेकांच्या माघारीची खातरजमा करून घेतल्याचेही सांगितले जाते. भारताबरोबरील संबंध सुरळीत करायचे असतील, तर चीनच्या लष्कराला इथून माघार घ्यावीच लागेल, असे भारताने वारंवार बजावले होते. दोन वर्षाच्या तणावानंतर चीनने भारताच्या मागणीनुसार या क्षेत्रातून आपले लष्कर माघारी घेतले. त्यामुळे हे भारताने स्वीकारलेल्या ठाम भूमिकेला मिळालेले फार मोठे यश ठरते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

india-chinaलडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या पार पडल्या. यातल्या १६ फेरीतील चर्चेत पूर्व लडाखमधील माघारीवर दोन्ही देशांच्या लष्कराचे एकमत झाले होते. त्यावेळी ही बाब उघड करण्यात आली नव्हती. त्यामुळे चर्चेची ही फेरी देखील अपयशी ठरल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण या चर्चेतच चीनने आपले लष्कर माघारी घेण्याची तयारी दाखविल्याचे कालांतराने उघड झाले. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये आयोजित करण्यात आलेली एससीओची बैठक, हे चीनच्या माघारीचे प्रमुख कारण असल्याचा दावा केला जातो. या बैठकीला भारताचे पंतप्रधान व चीनचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार असून त्याच्यामधील द्विपक्षीय चर्चेत एलएसीवरील तणावाचा अडथळा येऊ नये, यासाठी चीनने नमते घेतल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

तैवानच्या मुद्यावर चीनने अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांबरोबरील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा परिस्थितीत भारतासारख्या शेजारी देशाशी तणाव कायम ठेवणे चीनला परवडणारे नाही. आधीच्या काळातही चीनने एलएसीवर आपले लष्कर तैनात ठेवून भारताशी संबंध सुधारण्यासाठी हालचाली केल्या होत्या. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी यासाठी भारताचा दौरा देखील केला. पण भारताने सीमेवर सौहार्द प्रस्थापित झाल्याखेरीज चीनशी सहकार्य शक्य नसल्याची कणखर भूमिका स्वीकारली होती. तसेच चीन भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे दोन्ही देशांचे संबंध विकोपाला गेल्याची बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडली होती. चीन विस्तारवादी देश आहे, हे यामुळे अधिक ठळकपणे जगासमोर आले. याचेही दडपण चीनवर आले होते.

चीनच्या माघारीला ही पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्याचवेळी हिवाळा जवळ येत असून लडाखच्या एलएसीवर चिनी लष्कराच्या जवानांचा निभाव लागणे अतिशय अवघड बाब ठरते. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत चीनच्या लष्कराने याचा विदारक अनुभव घेतला होता. कडक हिवाळा सहन न झाल्याने चीनचे शेकडो जवान आजारी पडले होते. याचाही विचार करून चीनने इथून माघार घेण्याचा सूज्ञ निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यामुळे चीनला माघार घेण्यास भाग पाडणारा समर्थ देश अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचा फार मोठा लाभ भारताला मिळू शकेल.

leave a reply