मध्य आशियाई क्षेत्रातील सुरक्षेच्या मुद्यावर चीन व रशियाची आघाडी

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याने घेतलेल्या माघारीनंतर चीन व रशियाने मध्य आशियाई देशांमधील प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या देशांमधील दोन्ही देशांचे हितसंबंध वेगवेगळे असले तरी अमेरिकेला या क्षेत्रापासून दूर ठेवण्याचा मुद्यावर चीन व रशिया एकत्र येत असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी रशियात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर या चर्चेने जोर धरल्याचे सांगण्यात येते.

मध्य आशियाई क्षेत्रातील सुरक्षेच्या मुद्यावर चीन व रशियाची आघाडी१९९१ साली रशियन संघराज्याचे विघटन झाल्यानंतर चीनने मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली होती. या देशांमधील इंधन, ऊर्जा, खनिजे व वाहतूक क्षेत्रात चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून या देशांबरोबरील सुरक्षविषयक संबंधही मजबूत करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात चीनने या देशांना मोठ्या प्रमाणावर संरक्षण तंत्रज्ञान व शस्त्रसामुग्रही पुरविण्यास सुरुवात केली आहे.

मध्य आशियाई देशांमधील संरक्षणक्षेत्रात रशियाचा वाटा मोठा असून ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून रशियाने या क्षेत्रावरील आपली पकड कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या माघारीनंतर या क्षेत्रातील देशांना असलेला दहशतवाद व निर्वासितांच्या लोंढ्याचा धोका वाढला आहे. त्यामुळेे चीन व रशिया या दोन्ही देशांच्या हितसंबंधांना आव्हान मिळण्याची शक्यता असल्याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

मध्य आशियाई क्षेत्रातील सुरक्षेच्या मुद्यावर चीन व रशियाची आघाडीहे लक्षात घेऊनच मध्य आशियाई देशांसंदर्भातील अजेंडा ठरविण्यासाठी चीन व रशियाने हालचाली सुरू केल्याचे अलेक्झांडर कोली यांनी म्हटले आहे. रशियन नेतृत्त्व चीनच्या वाढत्या प्रभावावर फारसे खूष नसले तरी अमेरिकेचे वर्चस्व रोखण्यासाठी ते चीनला साथ देईल, याची जाणीवही कोली यांनी करून दिली. चीनला आपल्या सीमाभागातील उघुर संघटनांचा धोका कमी करायचा असून त्यासाठी चीन तडजोड करु शकते, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, चीन व रशियामध्ये इतर क्षेत्रातील सहकार्यही अधिक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनने आपल्या देशातील कोळशाची टंचाई दूर करण्यासाठी रशियाकडून कोळशाची आयात वाढविल्याचे समोर आले आहे. रशियाकडून आयात होणार्‍या कोळशाचे प्रमाण जवळपास तिपटीने वाढल्याचे चिनी यंत्रणांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

leave a reply