चीन, सौदी लष्करी सहकार्य वाढविणार

लष्करी सहकार्य वाढविणारबीजिंग – ‘चीन आणि सौदी अरेबिया, दोघेही चांगले मित्र आणि एकमेकांवर विश्‍वास ठेवणारे सहकारी देश आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात राजकीय विश्‍वास आणि सहकार्य वाढत असताना लष्करी क्षेत्रात देखील व्यावहारिक सहकार्य प्रस्थापित करणे आवश्यक ठरते’, अशी घोषणा चीनचे संरक्षणमंत्री वेंग फेंघ यांनी केली. सौदी अरेबियाचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांच्याबरोबर व्हर्च्युअल बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री फेंघ यांनी ही घोषणा केल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.

दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या बैठकीत, सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी देखील चीनबरोबरचे लष्करी संबंध उच्च स्तरावर नेण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर संरक्षणमंत्री फेंघ यांनी चीनच्या तैवान, हॉंगकॉंग आणि उघूरवंशियांबाबतच्या धोरणांना सौदीने दिलेल्या मजबूत समर्थनासाठी आभार व्यक्त केले. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने या बैठकीची बातमी प्रसिद्ध केली. ‘चीन आणि सौदीने परस्परांमधील समन्वय वाढविला पाहिजे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे विकसनशील देशांचे हित जपण्यासाठी, वर्चस्ववादी आणि अरेरावीला विरोध केला पाहिजे’, असे संरक्षणमंत्री फेंघ म्हणाले. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्यांनी अमेरिकेला लक्ष्य केल्याचा दावा चिनी माध्यमे करीत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीसह आखाती देशांमधूनही माघारीचे स्पष्ट संकेत दिले होते. याची तयारी म्हणून अमेरिकेने सौदी अरेबिया आणि युएईतील आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणा माघारी घेतल्या होत्या. तसेच बॉम्बर विमाने देखील काढून घेतली होती. बायडेन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आखाती देश अमेरिकेवरील विश्‍वास गमावून बसतील व याचा फायदा घेऊन चीन आखाती देशांमध्ये आपला प्रभाव वाढविल, असा इशारा अमेरिकेतील विरोधी पक्षांनी दिला होता.

लष्करी सहकार्य वाढविणारगेल्या दोन महिन्यांमधील चीन आणि आखाती देशांमधील सहकार्याबाबत समोर येणार्‍या बातम्या पाहता, अमेरिकी विरोधी पक्षाचे इशारे प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सौदी अरेबियासह ओमान, कुवेत व बाहरिनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा समावेश असलेले उच्चस्तरिय शिष्टमंडळ चीनच्या दौर्‍यावर गेले होते. या शिष्टमंडळात आखाती देशांची प्रमुख संघटना असणार्‍या ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल-जीसीसी’च्या प्रमुखांचाही समावेश होता. पाच दिवसांच्या या दौर्‍यात चीन व अरब देशांमध्ये इंधन, मुक्त व्यापार करार व धोरणात्मक सहकार्य या मुद्यांवर चर्चा झाली होती.

या सहकार्याचा पुढील टप्पा म्हणून चीन आणि सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेत्यामध्ये संरक्षण सहकार्याबाबत पार पडलेल्या बैठकीकडे पाहिले जाते. दरम्यान, चीन सौदी अरेबियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी सहाय्य करीत असल्याच्या बातम्या दीड महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या. सौदीच्या अल दवादमी येथे यासाठी काम सुरू असल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर चीन सौदीला अणुप्रकल्प उभारण्यासाठी देखील सहाय्य करीत आहे. चार महिन्यांपूर्वी यासंबंधी हालचाली सुरू झाल्या होत्या.

leave a reply