भारताच्या लष्करी सिद्धतेबाबत चीनने कुठल्याही भ्रमात राहू नये

- भारताच्या माजी लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या युद्ध सज्जतेबाबत चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने कुठल्याही प्रकारच्या भ्रमात राहू नये. हे १९६२ साल नाहीतर २०२० साल आहे, अशा शब्दात भारताचे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी चीनला इशारा दिला. तर माजी लष्करप्रमुख व सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री जनरल व्ही के सिंग यांनी आताच्या भारताला परिस्थिती कशी हाताळायची याची पूर्ण कल्पना आहे, असे चीनला बजावले आहे. भारताच्या सीमेत हजारो सैनिकांची घुसखोरी घडवून दडपण आणू पाहणाऱ्या चीनला माजी लष्कर प्रमुखांनी दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. लडाखच्या गलवान व्हॅली व पँगाँग सरोवर येथे चीनने आपले हजारो सैनिक तैनात केले असून यांची संख्या पाच हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

भारतानेही त्याच प्रमाणात इथे सैन्य तैनाती केली असून चीनी जवानांच्या डोळ्याला डोळा भिडवून भारतीय सैनिक इथे खडे टाकले आहेत. यासंदर्भात चीनने अद्याप आक्रमक भाषेचा प्रयोग केलेला नसला तरी भारतावर लष्करी दडपण वाढवण्यासाठी चीन हालचाली करीत आहे,असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारत आणि चीनमधील सीमावादाची अमेरिकेनेही गंभीर दखल घेतली असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकरणी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या माजी लष्करप्रमुखांनी चीनला खरमरीत इशारा दिला आहे. आजचा भारत चीनला मुखभंग करणारे प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत आहे, याची जाणीव ठेवावी असे माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी म्हटले आहे. तर भारताला वारंवार १९६२ सालच्या युद्धाच्या पराभवाची आठवण करून देणाऱ्या चीनने माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी आजचा भारत वेगळा आहे याची जाणीव करून दिली आहे.

१९६२ नसून २०२० साल आहे. २०२० सालचा भारत अतिशय वेगळा आहे ,असे जनरल व्ही. के.सिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वीच सध्याचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखची पाहणी करून इथल्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणदल प्रमुखांसह तिन्ही संरक्षणदलाच्या प्रमुखांबरोबर सुरक्षाविषयक बैठक घेतली होती. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करता येणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुखांनी चीनला दिलेल्या इशार्‍याचे महत्व अधिकच वाढले आहे.

चीनच्या सीमेवर हजारो जवान आणून ठेवले असले तरी भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्धाची शक्यता नाही असा निर्वाळा माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी दिला आहे. कोरोनाव्हायरसची साथ आटोक्यात आणण्यात अपयशी ठरल्याने चीनवर जगभरातून टीका होत आहे. तसेच चिनी जनतेमध्ये ही यावरून असंतोष आहे. अशा परिस्थितीत लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीन सीमावादाचा वापर करीत असावा, अशी दाट शक्यता भारताच्या दोन्ही माजी लष्करप्रमुखांनी वर्तविली आहे. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान ताब्यात घेण्याची तयारी केल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे पाकिस्तानला कापरे भरले असून चीन देखील आपला सीपीईसी प्रकल्प धोक्यात आल्याने अस्वस्थ बनला आहे. यामुळे भारतावर लष्करी दडपण टाकून पाकिस्तानव्याप्त काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तानचे बचाव करण्याचे धोरण चीनने स्वीकारले असावे, असा काही सामरिक विश्लेषक दावा करीत आहेत.

म्हणूनच चीन बरोबरील भारताच्या सीमावादावर पाकिस्तान चीनपेक्षाही अधिक आक्रमक प्रतिक्रिया देत आहे. मात्र भारताने चीन व पाकिस्तान यांनी आधी केलेली हातमिळवणी लक्षात घेऊन आपली लष्करी सज्जता ठेवलेली आहे व त्यामुळेच दोन्ही देशांच्या दबावतंत्राचा भारताच्या धोरणावर काडीचाही परिणाम होणार नाही, असा निर्वाळा भारतीय विश्लेषकांकडून करुन दिला जात आहे.

leave a reply