‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला झापले

बीजिंग/इस्लामाबाद – ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) आणि चिनी कामगारांच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला झापले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकांऱ्यामध्ये नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत चीनने पाकिस्तानला फटकारल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तात्काळ पाकिस्तानने ‘सीपीईसी’ची सुरक्षा वाढविल्याचे जाहीर केले. पण चीनने पाकिस्तानवरचा दबाव वाढविल्याचे यामुळे नव्याने उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पांसाठी काम करीत असलेल्या चिनी कामगारांकडून पाकिस्तानी जवानांना मारहाण झाली होती. त्यानंतर पाकिस्तानमध्ये चीनविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

‘सीपीईसी' प्रकल्पाच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला झापलेचीन पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्स खर्च करुन ‘सीपीईसी‘ प्रकल्प उभारीत आहे. यातील पंजाबमधल्या ‘करोट हायड्रोपॉवर प्रोजेक्ट’, ‘आझाद पॅटर्न प्रोजेक्ट’ प्रकल्पांच्या प्रगतीपथावर चीनने नाराजी व्यक्त केली. शिवाय इथली सुरक्षाव्यवस्थाही कुचकामी असल्याचे चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकांऱ्यानी म्हटले आहे. तर लाहोर प्रकल्प, पेशावर-कराची रोड प्रकल्पांची सुरक्षाव्यवस्था देखील वाढवायला हवी, असे चीनने पाकिस्तानला ठणकावून सांगितले. चीनच्या कर्जावर जगणाऱ्या पाकिस्तानने यानंतर सीपीईसी प्रकल्प आणि चिनी कामगारांसाठी ‘स्पेशल सिक्युरिटी डिव्हिजन’ची तैनाती वाढविण्याची घोषणा केली.

गेल्या आठवड्यात सीपीईसी प्रकल्पाला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानच्या दोन बंडखोर संघटना एकत्र आल्या आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे चीनच्या चिंता वाढल्या आहेत. ‘बलोचिस्तान लिब्रेरशन आर्मी’ (बीएलएफ) या बंडखोर संघटनेवर संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी टाकण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न करावे, अशी चीनने मागणी केली होती. त्यासाठी ते पाकिस्तानवर दबाव टाकत होते. पण पाकिस्तानकडून यासंबंधी पुढे काहीही हालचाली झाल्या नाही. या कारणामुळे चीन पाकिस्तानवर नाराज झाल्याचे बोलले जाते. त्यातच हा प्रकल्प आणि चिनी कामगरांवरील हल्ले देखील वाढत चालले आहेत.

‘सीपीईसी' प्रकल्पाच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला झापलेदरम्यान, काही दिवसांपूर्वीच सीपीईसी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या चिनी कामगारांकडून पाकिस्तानच्या जवानांना मारहाण झाली होती. पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकांऱ्यानी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यांनतर पाकिस्तानमध्ये चीनविरोधात नाराजी वाढली. आता सीपीईसीच्या सुरक्षेच्या कारणावरुन चीन आणि पाकिस्तानमधला तणाव वाढत चालला आहे. शिवाय चीन आणि पाकिस्तानमध्ये पैशांवरुनही वाद आहे. दोन्ही देशांकडून या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या भ्रष्टाचारात अडकल्याचे समोर येऊ लागले आहे.

leave a reply